सिंधुदुर्ग : ग्रामस्थ, पालक, शिक्षकांमुळे शाळेला पुनर्जीवन, लोकसहभागातून मुलांचे वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:51 AM2018-09-06T11:51:08+5:302018-09-06T12:01:19+5:30

कणकवली तालुक्यातील ओझरम येथील शतक महोत्सव पूर्ण केलेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ ही कमी पटसंख्येमुळे बंद पडण्याच्या अवस्थेत होती. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना वसतिगृह निर्माण करून त्यांना मोफत शिक्षण सुरू केले. हा उपक्रम अनेकांच्या मदतीने सुरू आहे.

Sindhudurg: Resident of the village due to villagers, parents and teachers, hostels of children from public sector | सिंधुदुर्ग : ग्रामस्थ, पालक, शिक्षकांमुळे शाळेला पुनर्जीवन, लोकसहभागातून मुलांचे वसतिगृह

लोकवर्गणीतून सकारात असलेल्या जिल्ह्यातील पहिल्या क्रीडा, सांस्कृतिक, निवासी शाळा संकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

googlenewsNext
ठळक मुद्दे ग्रामस्थ, पालक, शिक्षकांमुळे शाळेला पुनर्जीवन, लोकसहभागातून मुलांचे वसतिगृह राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा, शिक्षकदिनी इतरांसाठी आदर्श

निकेत पावसकर

तळेरे : कणकवली तालुक्यातील ओझरम येथील शतक महोत्सव पूर्ण केलेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ ही कमी पटसंख्येमुळे बंद पडण्याच्या अवस्थेत होती. अशावेळी ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून या शाळेला पुन्हा पुनर्जीवन मिळाले आणि २०१५-१६ मध्ये २ विद्यार्थी संख्या असलेली हीच शाळा आज ३५ विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचली. यासाठी या गावच्या आणि मुंबईच्या ग्रामस्थांनी शक्कल लढवित शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना वसतिगृह निर्माण करून त्यांना मोफत शिक्षण सुरू केले. हा उपक्रम अनेकांच्या मदतीने सुरू आहे.

सन १९०९ मध्ये स्थापना झालेल्या या शाळेच्या पटसंख्येला साधारणपणे दहा वर्षांपूर्वी गळती लागली आणि २०१५-१६ या वर्षात तर फक्त २ विद्यार्थी पटावर राहिले. अशा विद्यार्थी संख्येमुळे सातवीपर्यंतच्या या शाळेतील अनेक वर्ग बंदच राहू लागले. आजपर्यंत अनेक पिढ्या घडविणारी ही शाळा मरणासन्न अवस्थेत असताना काही जागरूक ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांमुळे या शाळेला पुनर्जन्म मिळाला.


१०० वर्षे पूर्ण केलेली कणकवली तालुक्यातील ओझरम येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ ची इमारत.

ही शाळा कायमस्वरूपी चालू रहावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. तत्पूर्वी २०१५ साली अवघे २ विद्यार्थी असताना या शाळेची जुनी इमारत पूर्णपणे बंद होती. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी आणि डागडुजी केली. त्याचवर्षी लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिली ई-लर्निंग शाळा बनविली.

त्यातून शाळेचे थोड्या प्रमाणात रूप पालटले. त्यावेळी तत्कालीन सरपंच विनायक राणे यांनी या शाळेला ऊर्जितावस्था येण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न केले. मात्र त्यावेळीही निश्चित नव्हते की पुढे किती विद्यार्थी मिळतील आणि शाळा कशी टिकेल. अशावेळी ग्रामस्थांनी केलेला मोठा खर्च हे धाडसच होते.

मात्र, ग्रामस्थांच्या त्या चिकाटीला यश आले. २०१५ साली २ वरून २१, पुढे ३२, नंतर २८ आणि आता ही विद्यार्थी संख्या ३५ वर जाऊन पोहोचली आहे. यामागे ओझरम ग्रामस्थांचे खूप मोठे योगदान आहे. त्यासाठी शिक्षणापासून वंचित राहणारी मुले, मजूर, सतत फिरत्या कुटुंबातील मुले आणि कौटुंबीक अडचणी असलेली अत्यंत गरीब मात्र हुशार मुलांचा शोध सुरू झाला.

यावेळी सातत्याने होणाऱ्या बैठकीतून या मुलांसाठी वसतिगृह उघडण्याची कल्पना पुढे आली आणि तिला मूर्त रुप मिळालेही. २०१५ साली पहिल्याच वर्षी आनंद तांबे, त्यानंतर लाडकोबा विष्णू राणे व सध्या जनार्दन दत्ताराम राणे यांच्या घरात हे वसतिगृह विनामोबदला सुरू आहे. त्यामध्ये विविध ठिकाणांहून आलेले १६ विद्यार्थी आहेत.

मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी शाळेच्या ७७ गुंठे जागेतील मोकळ्या ७० गुंठे जागेमधील २ गुंठे जागेत क्रीडा, सांस्कृतिक आणि निवासी शाळा संकुल लोकसहभागातून उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून २०१६ साली मान्यता मिळाली.

या संकुलाला अंदाजपत्रकानुसार सुमारे २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय हे संकुल पूर्णपणे लोकवर्गणीतून करावयाचे असल्याने शासकीय मदत मिळणार नाही. या संकुलाच्या बांधकामास मार्च २०१८ पासून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी फक्त १० हजार रुपये वर्गणी जमा होती. मात्र ओझरम ग्रामस्थांनी मोठे धाडस केले आणि त्यानंतर मदत मिळत गेली. आजपर्यंत या इमारतीचे सुमारे १३ लाखांचे काम पूर्ण झाले असून अजून अंदाजे १० ते १२ लाखांचे काम शिल्लक आहे.

हे संकुल जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेत विद्यमान सरपंच प्रदीप राणे, माजी सरपंच विनायक राणे, विजय उर्फ बाळा राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग बिर्जे, सदस्य गणेश भास्कर राणे, दीपक राणे यांच्यासह सर्व ग्रामस्थ एकमताने आणि एकजुटीने हे काम करीत असल्याचे दिसून येते. तर इमारतीचे बांधकाम व्यवस्थित होण्यासाठी बाबू राणे आणि विलास पाटील हे विनामोबदला लक्ष देतात.

 अनेकदा ग्रामस्थांकडून श्रमदान करून काही काम केले जाते. या शाळेतील १० मुले लांब अंतरावरून येतात. त्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बस एका ग्रामस्थाने मोफत दिली आहे.

हे मोठे शिवधनुष्य पेलण्यासाठी ग्रामस्थ एकत्रित प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, देणगीदार यांचे सहकार्य मिळत आहे. विशेष म्हणजे एकीकडे शासन कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करीत आहे आणि दुसरीकडे सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, हेही सांगत आहे. अशा द्विधा परिस्थितीत अनेक शाळा बंद पडत चाललेल्या दिसून येतात.

मात्र ओझरम गावातील ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे शतकी वाटचाल केलेल्या या शाळेने कात टाकली आणि पुन्हा नव्याने सुरू झाली. यामध्ये तरुण पिढीचा खूप मोठा सहभाग असून त्यांना ज्येष्ठ मंडळी, ग्रामपंचायत आणि इतर ग्रामस्थ सहकार्य करताना दिसतात.

भविष्यात लवकरच जिल्ह्यातील पहिली लोकवर्गणीमधून उभारलेली क्रीडा, सांस्कृतिक आणि निवासी शाळा संकुल असलेली जिल्हा परिषदेची शाळा पहायला मिळेल. ज्या शाळेतून आजही अनेक हुशार मुले बाहेर पडतात.

  1. ग्रामीण भागातील लोकसहभागातून झालेली जिल्ह्यातील पहिली ई-लर्निंग शाळा.
  2. बंद पडत असलेल्या, १०० वर्षे पूर्ण झालेल्या शाळेला केले पुनर्जिवीत.
  3. स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी केले प्रयत्न.
  4. या शाळेचे अनेक विद्यार्थी देश-परदेशात विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करून आहेत.
  5. जिल्हा आणि राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळविणारी आदर्श शाळा.
  6. या शाळेच्या ५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
  7. वसतिगृहात अनेक कष्टकरी, मजूर आणि होतकरू पालकांची मुले घेत आहेत मोफत शिक्षण.
  8. या उपक्रमाला मदत करण्याचे आवाहन

    माई सांभाळतात या वसतिगृहातील मुले
     

सध्या या वसतिगृहात एकूण १६ मुले आहेत. या मुलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ तारामती हरिश्चंद्र सावंत म्हणजे सर्वांच्या माई गेल्या दोन वर्षांपासून करतात. त्यांचा दिनक्रम पहाटे ६ वाजता सुरू होऊन रात्री १० वाजता संपतो. मुले शाळेतून आल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत खेळ खेळतात. पुन्हा ७ वाजता सर्व मुले एकत्रित सायंकाळची प्रार्थना करतात आणि त्यानंतर अभ्यास. यासाठी माई त्यांच्याकडे लक्ष देऊन असतात. तेथे गेल्यानंतर मुलांची शिस्त आणि आदर पाहून समाधान वाटते.

मदतीसाठी आवाहन

निवासी संकुलाच्या बांधकामासाठी अनेक हात एकत्र आले. काहींनी वस्तुरुपाने तर काहींनी रोख रक्कम देऊन मदत केली. उर्वरित कामासाठी सुमारे १२ लाखांची आवश्यकता आहे. त्यासाठी बँक आॅफ इंडिया तळेरे शाखेतील खाते क्रमांक १४७८१०११०००८००० वर पैसे भरावेत. दिनेश राणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ग्रामस्थांचे विशेष योगदान

वसतिगृहातील मुलांसाठी लागणारे साहित्य अथवा वस्तू ओझरम गावातील ग्रामस्थांसह दशक्रोशीतील अनेक देणगीदार देत आहेत. त्यासाठी महिन्याचा एका विद्यार्थ्याचा खर्च सुमारे एक ते दीड हजारपर्यंत आहे. मुंबईस्थित चाकरमानी गावी आले की ते या मुलांसाठी विविध प्रकारचे खाऊ देऊन जातात. तर काही दशक्रोशीतील ग्रामस्थ दर महिना ठरलेल्या वस्तू देऊन जातात. याचे सर्व व्यवस्थापन माई करतात. मार्इंच्या काटकसरीमुळे हे वसतिगृह सध्या अल्प खर्चात सुरू आहे.
 

Web Title: Sindhudurg: Resident of the village due to villagers, parents and teachers, hostels of children from public sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.