पुणे विमानतळाच्या अडवणुकीचा सिंधुदुर्गवासीयांना फटका
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 28, 2024 03:36 PM2024-06-28T15:36:08+5:302024-06-28T15:37:15+5:30
नारायण राणेंकडून दखल : विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगी नाकारत असल्याने नाराजी
सिंधुदुर्ग : चिपी येथील सिंधुदुर्गविमानतळावरून गोवा येथील फ्लाय ९१ या विमान कंपनीद्वारे मार्च महिन्यापासून सिंधुदुर्ग हैदराबाद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग बंगळुरू सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून काही दिवस ही सेवा अखंडित सुरू आहे. याच कंपनीकडून सिंधुदुर्ग पुणे सिंधुदुर्ग अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, पुणे येथील विमानतळाकडून ही सेवा सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. यासाठी टाइम स्लॉटचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत आता सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने खासदार नारायण राणे यांच्याशी पत्रव्यवहार करून हवाई वाहतूक मंत्र्यांमार्फत यासाठी प्रयत्न करण्यासाठी साकडे घातले आहेत. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनाही देण्यात आल्या आहेत.
चिपी विमानतळ सुरू होऊन आता तीन वर्षे उलटली आहेत. त्यामुळे विमानतळावरून ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहे. सध्या अलायन्स एअर या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विमान कंपनीकडून मुंबई महानगराशी जोडणारी विमानसेवा सुरू आहे. त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतानाही कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ती सेवा बेभरवशाची ठरत आहे. याला पर्याय म्हणून सिंधुदुर्ग पुणे सिंधुदुर्ग ही सेवा सुरू होणे आवश्यक आहे.
फ्लाय ९१ ची दर्जेदार, उत्तम सेवा
गोवा येथील फ्लाय ९१ या कंपनीकडून मार्च महिन्यापासून हैदराबाद आणि बंगळुरू या दोन महानगरांमध्ये जाण्यासाठी आठवड्यातून काही दिवस सेवा अखंडित सुरू आहे. काही वेळा खराब हवामान किंवा वादळी वाऱ्याचा फटका बसत असल्याने चिपी येथून विमान उड्डाणे होत नाही. मात्र, त्यादिवशी तेच विमान नजीकच्या गोवा राज्यातील मोपा येथील मनोहर इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण करून प्रवाशांना सेवा देत आहे. चिपी येथे विमान टेकऑफ करताना किवा लँडिंग करत असताना समस्या आल्यास त्या सर्व प्रवाशांची सोय करून मोपा येथून त्यांना सेवा दिली जात आहे.
पुणे येथील सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न आवश्यक
फ्लाय ९१ या कंपनीकडून हैदराबाद आणि बंगळुरू येथे सेवा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुणे येथून सेवा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न कंपनीकडून सुरू होते. मात्र, पुणे विमानतळाकडून या कंपनीला टाइम स्लॉटचे कारण दाखवून परवानगी नाकारण्यात आली आहे. ही बाब लक्षात येताच जिल्हा व्यापारी महासंघाने याबाबत खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नारायण राणेंचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र
खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांना पत्र देऊन सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा सुरू करण्यासाठी विनंती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती नीलेश सामंत यांनी याबाबत नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे पुणे येथील विमानतळावरून ही सेवा सुरू करण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाची बैठक घेऊन आपल्यालाही या बैठकीत उपस्थित राहण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.