निधी खर्चात सिंधुदुर्ग कोकणात आघाडीवर
By admin | Published: January 16, 2016 11:50 PM2016-01-16T23:50:10+5:302016-01-16T23:50:10+5:30
: भंडारी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यातील मंजूर १२५ कोटी निधीपैकी ५० कोटी निधी प्रत्यक्ष विविध विकासकामांवर खर्च करण्यात आला असून, उर्वरित निधी ३१ मार्चपूर्वी खर्च होईल. जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्यात सद्य:स्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात आघाडीवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनचा आराखडा १२५ कोटी रुपये एवढा मंजूर केला होता. यात जिल्हा महसूल प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागांना हा निधी वितरित करण्यात येतो. हा निधी मार्च २०१६ पूर्वी १०० टक्के खर्च होणे बंधनकारक आहे. जिल्हा नियोजनच्या आर्थिक बजेटच्या बैठकीत निधी चर्चेअंती मंजूर केला जातो. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार गतवर्षी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजनचा वार्षिक आराखडा १२५ कोटी रुपये मंजूर करून आणला होता.
याबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, मागील दहा महिन्यांच्या कालावधीत विविध विकासकामांवर ४० टक्के निधी म्हणजेच ५० कोटी निधी खर्च झाला आहे. उर्वरित ७५ कोटी निधी मार्चअखेर खर्च होणार आहे. निधी खर्चाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण विभागात आघाडीवर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीची सभा २१ जानेवारीला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.
या सभेत २०१६-१७ चा वार्षिक नियोजन आराखडा सादर केला जाणार आहे.
सभागृहात सविस्तर चर्चा केल्यानंतर या बजेटला मान्यता घेण्यात येणार असल्याचेही अनिल भंडारी यांनी स्पष्ट केले.