सिंधुदुर्ग : घरबांधणी परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतींना, वैभव नाईक यांचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:14 PM2018-11-30T17:14:47+5:302018-11-30T17:16:41+5:30
राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याला यश आले आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिंधुदुर्ग : राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याला यश आले आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२0१४ सालापूर्वी कोकणात घरबांधणी आणि घरदुरूस्तीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींना होते. मात्र त्यानंतर हे अधिकार ग्रापंचायतकडून काढून घेऊन तालुकास्तरावर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते. त्यासाठी काही जाचक अटींची पूर्तताही करावी लागत होती. मात्र कोकणवासियांसाठी हा निर्णयच जाचक ठरत होता. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा करत घरबांधणी परवानगीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतकडे देण्याची मागणी केली होती.
राज्याच्या इतर भागात गावठाण क्षेत्र आहे. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्गात गावठाण क्षेत्र नाही. ज्याप्रमाणे कुळवहिवाटीच्या जमिनींकरीता रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी वेगळा निर्णय घेण्यात आला होता, तोच आधार घेऊन ग्रामपंचायतींना पूर्ववत घरबांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आले आहेत.
आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. या बैठकीला महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता हे ही उपस्थित होते.
प्राधिकरण ग्रामपंचायत सोडून निर्णय लागू
रत्नागिरी, सिंधुदुर्गातील लोकांना ग्रामपंचायत स्तरावरच घरबांधणीची परवानगी मिळणे कसे आवश्यक आहे ही बाब आमदार नाईक यांनी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून दिली होती. कोकणवासियांची ही महत्त्वपूर्ण मागणी लक्षात घेऊन आता पूर्ववत ग्रामपंचायतना घरबांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आले आहेत. प्राधिकरण ग्रामपंचायत सोडून अन्य ग्रापंचायतींना हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.