सिंधुदुर्ग : आॅलिव्ह रिडलेची ती पिल्ले सोडली नैसर्गिक अधिवासात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:04 PM2018-04-09T15:04:34+5:302018-04-09T15:04:34+5:30
मोचेमाड समुद्र्रकिनारी संरक्षित केलेल्या दुर्मीळ आॅलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांच्या दोन घरट्यांमधून १२२ पिल्लांना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभाग व येथील स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
वेंगुर्ले : मोचेमाड समुद्र्रकिनारी संरक्षित केलेल्या दुर्मीळ आॅलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांच्या दोन घरट्यांमधून १२२ पिल्लांना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभाग व येथील स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मोचेमाड समुद्रकिनारी १४ फेब्रुवारीच्या दरम्यान आॅलिव्ह रिडले प्रजातीची अंडी येथील कासवमित्र श्रीधर कोचरेकर व अनिल टांककर यांनी वनरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन ठिकाणी कुंपण करून संरक्षित केली होती. यापैकी रविवारी एका घरट्यामधून ७५, तर दुसऱ्या घरट्यामधून ४७ मिळून १२२ पिल्ले सकाळच्या सुमारास अंड्यातून बाहेर आली.
यासंबंधी वनविभागाला माहिती देताच सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, तुळस वनरक्षक एस. एस. कांबळे, वन कर्मचारी संतोष इब्रामपूरकर यांनी मोचेमाड समुद्रकिनारी दाखल होत पाहणी व पंचनामा केला. येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पिल्लांना मोचेमाड समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी सुधीर कोचरेकर, बाळा कोचरेकर, श्रीधर कोचरेकर, अनिल टांककर, राजाराम तांडेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यापूर्वीही २६ मार्चला या किनाऱ्यावर ६१ पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. मोचेमाड समुद्र्रकिनारी अजूनही आॅलिव्ह रिडले प्रजातीची घरटी १२ ठिकाणी संरक्षित केली असून, एप्रिल व मे महिन्यात आॅलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना संधी मिळणार आहे.