सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाच्या महसुलात झाली भरघोस वाढ
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 18, 2023 06:33 PM2023-04-18T18:33:58+5:302023-04-18T18:34:13+5:30
एकूण १४ हजार ८१ नवीन वाहनांची नोंद
सिंधुदुर्ग : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या २०२२-२०२३ आर्थिक वर्ष २०२१-२०२२ च्या तुलनेत महसूल वसुलीमध्ये १३.५५ कोटीची म्हणजेच ३२ टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याशिवाय वाहन नोंदणीमध्ये दुचाकी २४००, चारचाकी २१२ तर परिवहन संवर्गात ५२५ ची वाढ झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी दिली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध वसुलीच्या माध्यमातून सुमारे ५६ कोटी ५२ लाख उत्पन्न मिळाले यामध्ये मोटार सायकल नवीन नोंदणी १० कोटी ७५ लाख, कार नवीन नोंदणी १९ कोटी ८५ लाख, परिवहन संवर्गातील नवीन वाहने १ कोटी ५५ लाख, जुना कर- ३ कोटी ६७ लाख, परिवहन वाहनांचा कर ६ कोटी ९ लाख, पर्यावरण कर १ कोटी १७ लाख, रस्ता सुरक्षा सेस ६८ लाख, शुल्क ८ कोटी ८९ लाख, तडजोड शुल्क (दंड) २ कोटी ८६ लाख, प्रवासी कर १ कोटी १ लाख अस एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल वसुली झाली आहे.
नवीन वाहन नोंदणी कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ कालावधीत जिल्ह्यात दुचाकी १० हजार ६४७, चारचाकी १ हजार ८४४ परिवहन १ हजार ५९० अशा एकूण १४ हजार ८१ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. गत आर्थिक वर्ष सन २०२१ -२०२२ च्या तुलनेत दुचाकी वाहन नोंदणीमध्ये २ हजार ४००, चारचाकी २१२ व परिवहन संवर्गातील वाहनामध्ये ५२५ ची वाढ झाली आहे.
वायुवेग पथकाने वार्षिक लक्षांक (तडजोड शुल्क) १ कोटी २५ लाख असून वार्षिक पूर्तता १ कोटी ३० लाख इतकी केली आहे. याचे प्रमाण १०४ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३९.९७ टक्के इतकी वाढ आहे. सीमा तपासणी नाक्यांवरील कामगिरीमध्ये वार्षिक लक्षांक २ कोटी इतका होता त्याची वार्षिक पूर्तता १०० टक्के करण्यात आली तर तडजोड शुल्क वार्षिक पूर्तता सुमारे १ कोटी ९४ इतकी होती तर बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनावरील कर १ कोटी ४० लाख असा एकूण ३ कोटी ३५ लाख ९ हजार इतका जमा झाला असल्याचे काळे यांनी सांगितले.