सिंधुदुर्ग : सावंत कुटुंबीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:37 PM2018-06-05T17:37:06+5:302018-06-05T17:37:06+5:30
माणगाव येथील रमेश सखाराम सावंत यांनी कुटुंबीयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सिंधुदुर्गनगरी : मालकीच्या जमिनीत चुलत बहिणीने उभारलेल्या इमारतीला परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायत, तलाठी, वीज मीटर देणाऱ्या वीज वितरण व इमारतीसाठी कर्ज देणाऱ्या बँकेच्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी वारंवार उपोषणे करूनही प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याशी झालेली चर्चाही निष्फळ ठरल्याने अखेर माणगाव येथील रमेश सखाराम सावंत यांनी कुटुंबीयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
आपल्याला न्याय मिळावा यासाठी सावंत यांनी आतापर्यंत गेल्या सव्वा वर्षात आठ ते दहा वेळा उपोषणे केली आहेत. तसेच आत्मदहनापूर्वीचे शेवटचे उपोषण मंत्रालयासमोर केले होते. निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याबाबत सबळ पुरावे देऊनही प्रशासन यात कारवाई करीत नाही. केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष व ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी योग्य त्या कारवाईसाठी प्रयत्नशील आहेत, असे सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजता प्रशासनाने सावंत कुटुंबीयांना चर्चेसाठी बोलाविले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने नाराज झालेल्या रमेश सावंत यांचा मुलगा सचिन याने धावत उपोषणस्थळ गाठले. या ठिकाणी आणून ठेवलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न सुरू केला.
यावेळी त्याने सोबत असलेल्या कुटुंबीयांनाही रॉकेल ओतून घेण्याचा सल्ला दिला. यावेळी तैनात पोलिसांनी सचिन याच्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यासह कुटुंबीयांना पोलीस व्हॅनमधून ओरोस पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अधिकारीच भ्रष्ट असल्याचा आरोप
माणगाव येथील सचिन सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी सावंत यांना आत्मदहन करण्यापासून अटकाव करताच सावंत यांनी आपल्यावर प्रशासनाने कशाप्रकारे अन्याय केला, असे सांगत टाहो फोडला.
दरम्यान, घटनास्थळी असलेली त्यांची पत्नी, आई व चार वर्षांच्या मुलीने हा सर्व प्रकार पाहून आक्रोश केला. यावेळी सचिन यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी या अधिकऱ्यांनी संबंधितांना पाठीशी घातले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी त्यांना साथ दिली. आता अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी त्यांनाच पाठिंबा देत आहेत असा आरोप करीत कुठे आहेत जिल्ह्यातील आमदार, खासदार व कुठे आहेत पालकमंत्री असा प्रश्न केला.