सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरावर पाणी कपातीचे संकट नाही : बबन साळगावकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:55 PM2018-04-10T16:55:52+5:302018-04-10T16:55:52+5:30
सावंतवाडी पालिकेच्या पाळणेकोंड धरण व केसरी नळपाणी योजनेतून शहराला जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून शहरावर पाणी कपातीचे एवढ्यात कोणतेही संकट नसल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.
सावंतवाडी : पालिकेच्या पाळणेकोंड धरण व केसरी नळपाणी योजनेतून शहराला जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून शहरावर पाणी कपातीचे एवढ्यात कोणतेही संकट नसल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.
दरम्यान, पालिकेने अग्निशामक बंबाच्या बाबतीत घेतलेल्या धाडसी निर्णयातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो असून पुन्हा एकदा बंब नागरिकांच्या सेवेत हजर झाला आहे. शिवाय पालिकेच्या अग्निशमन केंद्र्राचा मार्ग मोकळा झाला आहे.
येत्या आठवडाभरात त्याचे टेंडर काढण्यात येणार असल्याचे साळगावकर म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र्र बांदेकर, अनारोजीन लोबो, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.
यावेळी साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावर गोडबोले गेट बसविण्यात आल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी एक मीटरचा पाणी साठा जास्तीचा शिल्लक राहिला आहे. तसेच दुसरीकडे केसरी येथील नळपाणी योजनेवरील पाण्याची पातळी स्थिर आहे. त्यामुळे काही झाले तरी शहरातील नागरिकांना जुलै अखेरपर्यंत पाणी मुबलक प्रमाणात मिळणार आहे.
काही ठिकाणी उंचवठ्यावर असलेल्या घरांमध्ये पाणी पोहोचत नाही. मात्र इतर भागात दिवसांतून दोनवेळा पाणी देण्याबरोबर शहरानजीकच्या चराठे, माजगाव, कोलगाव आदी ग्रामपंचायतींनाही पालिका पाणीपुरवठा करते. साळगावकर पुढे म्हणाले, सावंतवाडी अग्निशमन केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी पालिकेच्या बाजूला आरक्षित असलेली जागा आमच्या ताब्यात आली आहे.
आता नव्याने त्या ठिकाणी केंद्र्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ५२ लाख रुपये आमच्याकडे निधी प्राप्त झाला आहे. तर अन्य लागणारा निधी शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आणखी एक बंब आणला जाणार आहे. येत्या आठवडाभरात त्यासाठी आवश्यक असलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
गुजरात-गोध्रातून आणणार पांढरी वाळू
शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा. पालिकेच्या शुद्धिकरण प्रकल्पात गुजरात येथील गोध्रा जिल्ह्यातील पांढऱ्या दगडाची वाळू आणण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच आम्ही त्याठिकाणी भेट देणार असून तेथील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत टेंडरव्दारे ही वाळू सावंतवाडीत आणण्यात येणार आहे, असे बबन साळगावकर यांनी सांगितले.