सिंधुदुर्ग : पुणे येथे होणार दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:28 PM2018-02-06T17:28:13+5:302018-02-06T17:44:34+5:30
अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सुदर्शन रंगमंच यांच्या सहयोगाने पुणे येथे ९,१० आणि ११ फेब्रुवारीला दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन होणार आहे. या संमेलनात देशभरातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार सहभागी होत आहेत.
कणकवली : अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सुदर्शन रंगमंच यांच्या सहयोगाने पुणे येथे ९,१० आणि ११ फेब्रुवारीला दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन होणार आहे. या संमेलनात देशभरातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार सहभागी होत आहेत. तसेच विविध विषयांवर कलासंवाद, चित्रप्रदर्शन, चित्रपट, शास्त्रीय संगीत मैफल आदी कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती अखंड लोकमंच सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी येथे दिली.
कणकवली येथील स्वामी आर्ट स्टूडियोत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नामानंद मोडक म्हणाले, अखंड लोकमंच सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने अखिल भारतीय स्तरावरील पहिले चित्र शिल्प कला संमेलन गतवर्षी कणकवलीत झाले होते. यानंतर दुसरे संमेलन पुणे येथील सुदर्शन रंगमंच, अहिल्यादेवी शाळेजवळ, शनिवार पेठ पुणे येथे होत आहे.
या कला संमेलनाचे उद्घाटन ९ फेबु्रवारीला सकाळी १० वाजता माधुरी पुरंदरे यांच्याहस्ते होईल. तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत किरण नगरकर, गझल नवाझ भीमराव पांचाळे आणि डॉ. जयंत पंडित असणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी १.३० ते ३ या वेळेत राजू सुतार (पुणे) आणि श्रीकांत कदम (पुणे) हे कलासंवाद साधणार आहेत.
दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत राम पंडित आणि गौरी पंडित यांचे गायन होणार आहे. दुपारी ४.३० ते ५ .३० या वेळेत मानस गोसावी यांचे मोहनवीणा वादन तर मृगेंद्र मोहाडकर यांचे बासरीवादन होईल. दुसर्या सत्रात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बडोदा येथील दीपक कन्नल हे कलारसिकांशी कलासंवाद साधार आहेत. तर रात्री १० नंतर चित्रपट सादर होणार आहे.
१० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पहिले सत्र होईल. यात पुणे येथील संदीप देशपांडे, अर्चना पेंडसे आणि अमर पाटील हे कलासंवाद साधणार आहेत. तर दुपारी ४ ते ५ या वेळेत भाग्यश्री पांचाळे आणि सुनील बोरगावकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. दुसर्या सत्रात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पुणे येथील समर नखाते हे कलासंवाद मध्ये सहभागी होणार आहेत. तर रात्री १० नंतर चित्रपट होणार आहे.
रविवारी चित्र शिल्प आणि कला संमेलनाचा समारोप होणार आहे. यात पहिल्या सत्रात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पुणे येथील सतीश काळे आणि अभिजित रणदिवे हे कलारसिकांशी कलासंवाद साधणार आहेत. तर दुपारच्या सत्रात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मानसकुमार यांचे व्हायोलिन वादन होईल. त्यांना मनीष मदनकर हे तबलासाथसंगत करणार आहेत. दुसर्या सत्रात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत ज्येष्ठ आणि नामवंत चित्रकार प्रभाकर कोलते हे कलारसिकांशी कला संवाद साधणार आहेत.
या संमेलनाच्या तिन्ही दिवशी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात एफ. एन. सुझा, एन. एस. बेंद्रे, तय्यब मेहता, किशन खन्ना, के. एच. आरा, राम कुमार, एस. एच. रझा, सदानंद बाकरे, के. के. हेब्बर, या आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभलेल्या कलाकारांच्या चित्रांचं प्रदर्शन बघण्याचा योग कलारसिकांना लाभणार आहे.
त्याचबरोबर नव्या पिढीतील कलाकार जॉन तुन्सेन, राजू सुतार, प्रकाश वाघमारे, सतीश काळे, अमर पाटील, हेमंत ढाणे, श्रीकांत कदम, नितीन हडप, संदीप सोनवणे, वैशाली ओक आणि सई देशपांडे यांच्याही चित्राचे प्रदर्शन सोबत असणार आहे.
कणकवलीनंतर पुणे येथे होत असलेल्या या चित्र शिल्प कला संमेलनाला सिंधुदुर्गातील कलावंत आणि रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नामानंद मोडक यांनी यावेळी केले.
सिंधुदुर्गात होणार चित्र प्रदर्शन !
पुणे येथील चित्र शिल्प कला संमेलनाच्या ठिकाणी सुमारे १३० कलाकारांच्या ३०० चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. या संमेलनानंतर या चित्रांचे प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नामानंद मोडक यांनी दिली.