सिंधुदुर्ग : मराठा समाजाचे मार्गदर्शक व्ही. डब्ल्यू. सावंत यांचे निधन, कणकवलीत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:59 PM2018-06-29T14:59:45+5:302018-06-29T15:02:53+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चातील अग्रणी, मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सेवानिवृत्त एसटी अधिकारी वसंत वामन उर्फ व्ही. डब्ल्यू. सावंत यांचे गुरूवारी दुपारी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत अनेक मराठा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चातील अग्रणी, मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सेवानिवृत्त एसटी अधिकारी वसंत वामन उर्फ व्ही. डब्ल्यू. सावंत यांचे गुरूवारी दुपारी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत अनेक मराठा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान , शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता कणकवली येथील मराठा मंडळ जवळील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भिरवंडे गावचे सुपूत्र असलेले व्ही. डब्ल्यू. सावंत हे एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातून विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी म्हणून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. एसटी महामंडळामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखापाल, पर्यवेक्षक व अधिकारी अशा विविध पदांवर ते कार्यरत होते.
एसटी कामगार संघटनेमध्ये ते राज्य उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. एसटी कामगार संघटनेचे संस्थापक भाऊ फाटक, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या सोबत व्ही. डब्ल्यू. सावंत यांनी काम केले होते. एसटी कामगार संघटना सिंधदुर्गचे ते संस्थापक होते. एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर कामगार संघटनेमध्ये मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते.
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, स्वर्गीय श्रीधर नाईक यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. एसटी महामंडळातून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असत .
मराठा मुक मोर्चा कणकवली तालुका समन्वयक पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाने शिवजयंती उत्सवाचे यशस्वी आयोजनही केले होते. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान ओरोस तसेच एसटी को. ऑप. बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.कणकवली व परिसरात एखादा अपघात झाला किंवा दुःखद घटना घडली तर मदतीसाठी ते नेहमीच पुढे असत.
गेले काही महिने ते आजारी होते. त्यांच्यावर कणकवली तसेच पुणे येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. आजारपणातच त्यांचे गुरूवारी दुपारी पुणे येथे निधन झाले.गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह कणकवली मधलीवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आला. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर कणकवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.