सिंधुदुर्ग : कुडाळातही स्टुडिओसह दुकान फोडले, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 04:28 PM2018-05-23T16:28:32+5:302018-05-23T16:28:32+5:30
मालवण व बांद्यानंतर चोरट्यांनी कुडाळ बाजारपेठेला लक्ष्य करीत येथील फोटो स्टुडिओ आणि ब्युटीपार्लरचे दुकान फोडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. भरवस्तीत धाडसी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पोलीस आवळणार का? असा प्रश्न येथील व्यापारीवर्ग व जनतेला पडला आहे.
कुडाळ : मालवण व बांद्यानंतर चोरट्यांनी कुडाळ बाजारपेठेला लक्ष्य करीत येथील फोटो स्टुडिओ आणि ब्युटीपार्लरचे दुकान फोडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. भरवस्तीत धाडसी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पोलीस आवळणार का? असा प्रश्न येथील व्यापारीवर्ग व जनतेला पडला आहे.
काही दिवसांपूर्वी मालवण येथील फोटो स्टुडिओ चोरट्यांनी फोडून त्यामधील लाखो रुपयांच्या कॅमेऱ्यांसह इतर वस्तू लंपास केल्या होत्या. त्यानंतर रविवारी रात्री बांदा बाजारपेठेतील फोटो स्टुडिओ फोडून लाखो रुपयांचे कॅमेरे लांबविले होते.
या दोन्ही घटना ताज्या असतानाच सोमवारी रात्री कुडाळ बाजारपेठेतील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ व आदर्शनी ब्युटीपार्लर फोडून रोख रकमेसहीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
कुडाळ बाजारपेठेत दत्ता देशमुख यांचा त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास देशमुख यांची पत्नी व मुलगा स्टुडिओ उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाच्या शटरच्या कुलुपाकडील लोखंडी भाग कापलेला दिसून आला.
याबाबत त्यांनी बाजूच्या दुकानदारांना माहिती दिली. या सर्वांनी स्टुडिओचे शटर उघडून आत प्रवेश केला असता स्टुडिओतील चार कॅमेरे, छायाचित्र काढण्यासाठी आवश्यक असलेले इतर साहित्य व गल्ल्यातील सुमारे अडीच हजारांची रक्कम गायब होती. देशमुख यांनी याबाबत तत्काळ कुडाळ पोलिसांना माहिती दिली.
देशमुख यांच्या फोटो स्टुडिओपासून काही अंतरावरील शिरसाट बिल्डींगच्या गाळ्यातील आदर्शनी ब्युटीपार्लरचे कुलूप तोडून आतील सर्व मशिन तसेच सौंदर्य प्रसाधने व बेन्टेक्सची ज्वेलरी तसेच काही रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
ब्युटीपार्लरचे मालक डी. डी. परब यांनी कुडाळ पोलिसांना कळविले. दोन्ही दुकानांमध्ये चोरट्यांनी कटावणीसारख्या हत्याराचा वापर करीत मागच्या बाजूने प्रवेश केला. ही दोन्ही दुकाने कॉम्प्लेक्समध्ये शेवटच्या बाजूला आहेत. तसेच दोन्ही दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. ही बाब हेरून पूर्वपाहणी करूनच चोरट्यांनी ही चोरी केल्याचे दिसून येत होते.
दरम्यान, आदर्शनी ब्युटीपार्लरमध्ये चोरट्यांच्या पायांचे ठसे मिळाले असून, या आधारावर पोलीस चोरट्यांच्या तपास लावण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
भीतीचे वातावरण
जिल्ह्यात मालवण, बांदा व आता कुडाळ या तिन्ही ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये फोटो स्टुडिओंनाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ चालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.
गस्ती मार्गावरच चोरी
चोरी झालेली ही दोन्ही दुकाने शहरातील मुख्य बाजारपेठेत असून, या मार्गावरून रात्रीच्यावेळी कुडाळ पोलिसांची गस्त असते. तसेच भरवस्तीत ही दुकाने असूनही चोरट्यांनी मोठ्या धाडसाने ही चोरी केली.
दोन कॅमेरे, मेकअप साहित्य लंपास
चोरट्यांनी फोटो स्टुडिओतील निकॉन कंपनीचे सुमारे १ लाख रुपयांचे दोन कॅमेरे, कसिनो कंपनीचे सुमारे ६० हजार रुपयांचे दोन कॅमेरे, फ्लॅशगन, लेन्स, मेमरी कार्ड व अडीच हजारांची रोख रक्कम मिळून सुमारे दोन लाख, तर ब्युटीपार्लरमधील ड्रायर, आयनिंगच्या मशीन, मेकअप साहित्य, कॉस्मेटिक साहित्य व बेन्टेक्स दागिने मिळून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ब्युटीपार्लरमधील किमती वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.
याच खिडकीतून दुकानात शिरण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
फोटो स्टुडिओतील लाखो रुपये किमतीचे कॅमेरे चोरट्यांनी चोरले.