सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा - मंत्री दीपक केसरकर
By अनंत खं.जाधव | Published: August 12, 2023 05:58 PM2023-08-12T17:58:23+5:302023-08-12T17:58:50+5:30
कोट्यवधी खर्च करून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन केले खरे पण स्थानिकांची याकडे पाठ फिरवली
आंबोली : सिंधुदुर्ग सोन्याची खाण असून पर्यटनात नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाच आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा म्हणून शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. आंबोली येथे महाराष्ट्र पर्यटन विभाग व आंबोली ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा पर्यटन महोत्सवात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, उपवनसंरक्षक एस.एन रेड्डी, पर्यटनचे सचिन गोसावी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बाबा मोडकर, सरपंच सावित्री पालयेकर, शशीकांत गावडे उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, आंबोलीसह सावडाव, नापणे धबधब्यांवर बारमाही पर्यटन राहावे यासाठी पुढील काळात नियोजन करण्यात येणार आहे. आंबोली जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी एडव्हेंचर स्पोर्टला महत्व देण्यात आले आहे. जंगल सफारी पॅराग्लाइडिंग पेराशूटिंग अशा विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी देशासह विदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी पर्यटन महोत्सव झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरू केले त्यात बऱ्यापैकी यश येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंबोली येथील पर्यटन महोत्सव असल्याचे त्यांनी सागितले. माजी आमदार राजन तेली यांनी आंबोली प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर भागात ही पर्यटक वाढले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
कोट्यवधीचा खर्च पण स्थानिकांची पाठ
पर्यटन विभागाने कोट्यवधी रूपयांचा खर्च करून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन केले खरे पण स्थानिकांची मात्र याकडे पूर्णपणे पाठ फिरवली. स्थानिक स्टॉल धारक ही मिळाले नाहीत. यामुळे बाहेरून काही स्टॉल आणावे लागल्याचे आंबोली ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आले. आम्हाला कालपर्यत काहीच माहीत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.