सिंधुदुर्ग :कर्ज परतफेडीसाठी प्रयत्न व्हावेत : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:43 PM2018-05-28T15:43:22+5:302018-05-28T15:43:22+5:30

जिल्ह्यात आंबा बागायतदार यांच्याकडून काही प्रमाणात कर्ज थकित असल्याचे दिसून येत आहे. तेही शंभर टक्के कर्ज परतफेड करतील यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जिल्हा बँकेच्या पडिक जमीन लागवड कर्ज योजनच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Sindhudurg: Should Try to Repay Loans: Sharad Pawar | सिंधुदुर्ग :कर्ज परतफेडीसाठी प्रयत्न व्हावेत : शरद पवार

कुक्कुटपालन योजनेसाठी कर्जाचा धनादेश माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सुपुर्द करण्यात आला.

Next
ठळक मुद्देकर्ज परतफेडीसाठी प्रयत्न व्हावेत : शरद पवार जिल्हा बँकेच्या पडिक जमीन लागवड कर्ज योजनेचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कर्ज परतफेड करण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. येथील शेतकरी घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे फेडत असला तरी आंबा बागायतदार यांच्याकडून काही प्रमाणात कर्ज थकित असल्याचे दिसून येत आहे. तेही शंभर टक्के कर्ज परतफेड करतील यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जिल्हा बँकेच्या पडिक जमीन लागवड कर्ज योजनच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ज्यावेळी जिल्ह्यात काजू पिकात आंतरपीक म्हणून बांबू पिकाची लागवड झाली तर जिल्ह्यात हरित क्रांती होईल, असे पवार म्हणाले.

पडवे येथील कार्यक्रमासाठी आलेल्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेची नवीन इमारत आणि बँकेच्या कामकाजाची पाहणी केली.

यावेळी जिल्हा बँकेच्या पडिक जमीन विकास कर्ज योजनेचा शुभारंभ जिल्हा बँकेच्या सभागृहात पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी उपस्थित होते.

जिल्हा बँकेने सुरू केलेल्या पडिक जमीन लागवड कर्ज योजनेंतर्गत आंबा, काजू व बांबू लागवडीसाठी कर्ज मागणी केलेल्या लाभार्थ्यांना शरद पवार यांच्या हस्ते कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.

यात काजूसाठी जागृती गायकवाड, चंद्रशेखर परब, नितीन गावडे, अशोक पराडकर आदींचा समावेश होता. याचबरोबर कुक्कुट पालन योजनेसाठी कर्ज घेतलेल्या समीक्षा सावंत आणि प्रकाश म्हाडगुत यांनाही लाभाचे पत्र देण्यात आले.

यावेळी पवार म्हणाले, जिल्हा बँकांकडील कर्ज घेतलेल्या संबंधितांनी परतफेड न केल्याने या बँका डबघाईस आल्या होत्या. या बँका जीवित रहाव्यात यासाठी केंद्र शासनाने सुमारे ८५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

कर्ज थकित असल्याने जिल्हा बँकांना वाचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही एकमेव बँक अशी होती की जिचा व्यवहार सुस्थितीत होता. या बँकेचे कर्ज परतफेडीचे प्रमाण चांगले होते.

बँकेच्या एनपीएचे प्रमाण ० टक्के आहे हे समाधानकारक आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बँक प्रयत्न करीत आहे. ही बँक शेतकऱ्यांसाठी झटत असल्याने येथील शेतकरी आपुलकीने आपले कर्ज परतफेड करीत आहे, असे पवार म्हणाले.

येथील सर्वसामान्य शेतकरी आपले कर्ज १०० टक्के परतफेड करीत असला तरी येथील आंबा बागायतदारांचे कर्ज थकित असल्याचे दिसून येत आहे. तेही १०० टक्के कर्ज परतफेड करतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या ८५ हजार हेक्टर जमीन पडिक आहे. हे पडिक क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी जिल्हा बँकेने काजू व आंबा तसेच बांबू पीक लागवडीसाठी सुलभ कर्ज योजना तयार केली आहे.

या योजनेमुळे लहान शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत ६० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.

..तर हरितक्रांती होईल

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पडिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी कर्ज योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आंबा व काजू बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून बांबू लागवड केली तर सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

असे झाल्यास जिल्ह्यात हरितक्रांती नक्कीच होईल, असेही प्रतिपादन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले.
 

Web Title: Sindhudurg: Should Try to Repay Loans: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.