सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीत ताकद दाखवा : वैभव नाईक यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:38 PM2018-10-29T13:38:10+5:302018-10-29T13:39:49+5:30
युवासेनेत चांगले काम केलात तर भविष्यात शिवसेनेमध्येही तुम्हांला चांगले भवितव्य आहे. यासाठी प्रथमत: युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन मतदारांची नावनोंदणी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले.
सिंधुदुर्ग : आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. तशीच ती राजकारणातही आहे. यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवासेनेची ताकद दिसून आली आहे. तसेच काम आगामी निवडणुकांमध्ये होणे गरजेचे आहे. युवासेनेत चांगले काम केलात तर भविष्यात शिवसेनेमध्येही तुम्हांला चांगले भवितव्य आहे. यासाठी प्रथमत: युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन मतदारांची नावनोंदणी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले.
कणकवली विजय भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना कार्यकारिणीमध्ये रिक्त असलेल्या व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी इच्छुक युवा सैनिकांच्या मुलाखती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व युवासेना मुंबई कोअर कमिटीच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना वैभव नाईक बोलत होते.
ते पुढे म्हणाले, नवीन मतदारांची नावनोंदणी झाल्यास कणकवली मतदार संघातही मोठ्या मताधिक्याने शिवसेनेला विजय संपादन करता येईल. त्यासाठी प्रत्येक युवासैनिकाने किमान १० नवीन मतदारांची नावनोंदणी करावी. कुडाळ-मालवण मतदारसंघात विद्यार्थी वर्गासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कणकवलीतही विद्यार्थीप्रमुख नेमून विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घ्यावेत. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही करू, असे आमदार नाईक यांनी सांगितले.
यावेळी युवासेना सहसचिव (मुंबई) देवेंद्र कांबळी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. हर्षद गावडे, कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, वैभववाडी तालुकाप्रमुख स्वप्नील धुरी, कणकवली सरचिटणीस अनुप वारंग, वैभववाडी सरचिटणीस अतुल सरवटे, शहरप्रमुख तेजस राणे, उपतालुकाप्रमुख सचिन पवार, ललित घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, रोहित राणे, सिद्धेश राणे, वैभव सावंत आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटना बळकट करा : अरुण दुधवडकर
यावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करीत आहेत . त्यामुळे युवासेनेत उत्साह आहे. हा उत्साह कायम ठेवून युवासेना संघटना बळकट करणे गरजेचे आहे.
यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे. उद्धव ठाकरे यांनी ह्यएकला चलो रेह्णचा दिलेला नारा यासाठी जिद्दीने अपेक्षित असलेले काम आपण करायचे आहे. येत्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही आमदार व खासदार निवडून आणून आपल्याला पक्षप्रमुखांना अनोखी भेट द्यायची आहे, असेही ते म्हणाले.