सिंधुदुर्ग : ओरोस येथे मोदी सरकार चले जावचा नारा, महामार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 02:02 PM2019-01-09T14:02:08+5:302019-01-09T14:05:34+5:30
ओरोस श्री देव रवळनाथ मंदिरसमोर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तब्बल १५ मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सिंधुदुर्गनगरी : चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव.., कामगारांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो..!, कामगार एकजुटीचा विजय असो...!, मानधन नको, वेतन हवे अशा विविध गगनभेदी घोषणा देत सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न असणाऱ्या आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी यांनी दोन दिवसांच्या संपावर जात ओरोस श्री देव रवळनाथ मंदिरसमोर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तब्बल १५ मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (छाया : विनोद परब)
शेकडोंना अटक व सुटका!
आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी तसेच वैद्यकीय प्रतिनिधी यांनी आपल्या मागण्यांसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर रास्ता रोको करीत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित शेकडो कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व समज देत त्यांची सुटका करण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या...
जीवनावश्यक वस्तूंच्या सट्टाबाजारावर बंदी घाला, महागाई नियंत्रणात आणा, किमान वेतनाची हमी द्या, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, सर्व कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा, शेतकरी शेतमजूर यांना पेन्शन लागू करा, कंत्राटीकरण बंद करा यासह एकूण १२ मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.