'कान्स' चित्रपट महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची छाप, ‘बनी' चित्रपटाचा फर्स्टलूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:53 PM2022-05-26T17:53:33+5:302022-05-26T17:54:11+5:30
मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.
अनंत जाधव
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणेली येथील सुपुत्र चित्रपट निर्माते शंकर धुरी यांच्या ‘बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक ७५ व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट इंडिया महोत्सवादरम्यान पॅव्हेलियनमध्ये करण्यात आला. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
आपला चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपटाचे निर्माते, कलावंत वेगवेगळ्या कल्पक योजना आखतात. ठिकाणे निवडतात. आपले प्रमोशन इतरांपेक्षा वेगळे असावे, रसिकांनी त्याची दखल घेऊन आपली कलाकृती पाहण्याची उत्सुकता दाखवावी, चार कौतुकाचे शब्द बोलावेत यासाठी हा सगळा प्रपंच सुरू असतो. अशीच एक चमकदार कल्पना आखून निर्माते शंकर धुरी दिग्दर्शक नीलेश उपाध्ये यांनी प्रत्यक्षात उतरविली आहे.
‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक ७५ 'कान्स' आंतरराष्ट्रीय महोत्सवादरम्यान इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला. या मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.
या चित्रपटाचे निर्माते धुरी हे मूळचे नाणेली (ता. कुडाळ) येथील आहेत. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण माणगाव हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण एसपीके महाविद्यालयात झाले. १९९९ पासून ते चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. गेली अनेक वर्ष अनेक यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीची कार्यकारी धुरा त्यांनी सांभाळली आहे.
नवोदित दिग्दर्शक नीलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांसोबत निर्मितीच्या अनुभवांचं भारदस्त गाठोडं घेऊन पदार्पण करणाऱ्या निर्माते शंकर धुरी यांची बनी' ही पहिली कलाकृती असून, ती नीट आणि आशयपूर्ण पद्धतीने आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी कान्सचे व्यासपीठ निवडल्याचे म्हटले आहे.
आपला मराठी चित्रपट सीमोल्लंघन करून जगभरातील जिज्ञासू, रसिकांसमोर यापूर्वीच पोहोचला आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याविषयीचं कुतूहल निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्षं आपले मराठी चित्रपट चोख करीत आहेत. जगभरातील सुजाण प्रेक्षक आपल्या चित्रपटांचे मनःपूर्वक कौतुक करतात, तेव्हा खरा आनंद होतो. - शंकर धुरी, निर्माते, बनी