गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीच्या प्रवासासाठी जादा सात गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:15 PM2018-08-20T16:15:24+5:302018-08-20T16:24:26+5:30
गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध भागात जाण्यासाठी सात जादा गाड़यांची सोय करण्यात आली असून त्यांचे ऑनलाईन बुकिंग सूरू झाले आहे.अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.
येथील विभागीय कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी अनेक भाविक मुंबई, पुणे आदी भागातून येत असतात.
परतीचा प्रवास करताना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी प्रशासनाने नियोजन केले आहे. 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत मुंबईच्या विविध भागात सिंधुदूर्गातील विविध आगारातून सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये विजयदुर्ग - बोरीवली सायंकाळी 4 वाजता, सावंतवाड़ी -बोरीवली दुपारी 3.30 वाजता, कणकवली - बोरीवली सायंकाळी 5 वाजता, कणकवली - मुंबई सायंकाळी 4 वाजता, फोंडा- बोरीवली सायंकाळी 5 वाजता, देवगड - बोरीवली दुपारी 3.30 वाजता व सायंकाळी 4.45 वाजता . या गाड्यांचा समावेश आहे.
या जादा गाडयांचे आरक्षण सुरु झाले असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या गाडयांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंत्तर आणखीन जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांमुळे एस.टी.च्या जिल्हाअंतर्गत सेवा देणाऱ्या गाडयाना गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन चांगले भारमान असलेल्या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. भविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ठाणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यन्त 61 गाडयांचे बुकिंग झाले असून या गाड़यांची संख्या आणखिन वाढणार आहे. मुंबईच्या इतर भागातूनहि गाडयांचे आरक्षण झाले आहे.त्यांचा नेमका आकड़ा येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.असेही ते यावेळी म्हणाले.
प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय !
परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय करण्यात येणार आहे. प्रवाशानी मागणी केल्यास त्यांच्या विशिष्ट गावातून अथवा वाडीतून ग्रुप बुकिंग द्वारे गाडी उपलब्ध करून दिली जाईल. असेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले.