सिंधुदुर्ग : वैभववाडीतील धान्य दुकानांवरील स्थिती : पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:21 PM2018-05-22T16:21:37+5:302018-05-22T16:21:37+5:30
रास्त धान्य दुकानांवर पुरविण्यात आलेल्या सदोष ई-पॉस मशीन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या समस्येने तालुक्यातील धान्य दुकानदारांना ग्रासले आहे. त्याचा फटका लाभार्थींना बसत असून बायोमेट्रिकच्या सक्तीमुळे जनतेला नाहक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
वैभववाडी : रास्त धान्य दुकानांवर पुरविण्यात आलेल्या सदोष ई-पॉस मशीन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या समस्येने तालुक्यातील धान्य दुकानदारांना ग्रासले आहे. त्याचा फटका लाभार्थींना बसत असून बायोमेट्रिकच्या सक्तीमुळे जनतेला नाहक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे. मात्र, पुरवठा विभागाकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने धान्य दुकानदार आणि जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने धान्य वितरण व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली अंमलात आणून धान्य दुकानांवर त्याची सक्ती केली. त्याला संभाव्य अडचणी लक्षात घेऊन धान्य दुकानदारांनी विरोध केला. मात्र धान्य दुकानदारांचा विरोध मोडीत काढून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीन पुरविण्यात आल्या. परंतु, धान्य दुकानांवरील समस्या आणि जनतेच्या गैरसोयीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
तालुक्यातील ३४ गावांमध्ये रास्त धान्य दुकाने मंजूर असून त्यापैकी सध्या ३१ दुकाने कार्यान्वित आहेत. तर तीन गावे लगतच्या धान्य दुकानांवर जोडण्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व धान्य दुकानांवर ई-पॉस मशीनद्वारे ठसे घेऊन बायोमेट्रिक पद्धतीनेच धान्य वितरणाची सक्ती करण्यात आले असून इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये आॅफलाईन धान्य वितरणाची मुभा देण्यात आली आहे. परंतु, इंटरनेट कनेक्टिव्हीटी असलेल्या गावातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
बऱ्याच ई-पॉस मशीन सदोष असल्याने त्यामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध असूनही कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने ई-पॉस मशीन एरर दाखवितात. त्यामुळे लाभार्थींना धान्यासाठी दिवस दिवस दुकानावर घालवूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
त्यामुळे धान्य दुकानदारांवर ग्राहक रोष व्यक्त करु लागले आहेत. याबाबत धान्य दुकानदारांनी पुरवठा विभागाला कल्पना देऊनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील धान्य दुकानदारांची अवस्था मृदुंगासारखी झाली आहे.
आपत्कालीन स्थितीत आॅफलाईनची मुभा द्यावी
तालुक्यात ३४ रास्त धान्य दुकाने मंजूर असून त्यापैकी मांगवलीला वेंगसर, अरुळेला निराळे आणि सांगुळवाडीला नावळे गाव जोडण्यात आले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण करताना ई-पॉस मशीनद्वारे ठसे घेतल्याशिवाय धान्य वितरण न करण्याचे पुरवठा विभागाचे सक्त आदेश आहेत.
त्यामुळे दोन गावातील लाभार्थीना बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या अडचणीत टाकत आहे. त्यामुळेच लाभार्थींना दिवस दिवस ताटकळत बसावे लागत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसताना आणि 'ई-पॉस' मशीनमध्ये तांत्रिक बिघाड उद््भवल्यास आॅफलाईन पध्दतीने धान्य वितरणाची मुभा मिळावी, अशी मागणी धान्य दुकानदार व लाभार्थींकडून केली जात आहे.