सिंधुदुर्ग : कणकवलीत पोलिसांचे संचलन, नगरपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 04:10 PM2018-03-22T16:10:23+5:302018-03-22T16:10:23+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांनी संचलन केले. निवडणूक ६ एप्रिलला होणार आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील महत्वाच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांनी संचलन केले. निवडणूक ६ एप्रिलला होणार आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणूक भाजप, शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व कणकवली शहर विकास आघाडी यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत नाराजी, इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीटवाटपातून निर्माण झालेले मतभेद यामधून या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत गडबड-गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या निवडणुकीसाठी जादा पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. सध्या होमगार्डनाही बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले आहे.
सध्या रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे.
गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कणकवली पोलिसांकडून सोमवारी रात्री १0 ते पहाटे ५ पर्यंत आॅल आऊट आॅपरेशनही पार पडले. या आॅपरेशनमध्ये १८ गुन्हेगार पोलिसांना सापडले. रात्री मोकळ्या मैदानांचीही पोलिसांनी तपासणी केली. मोकळ्या मैदानांवर रात्रीच्या वेळी पार्ट्या करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे मैदानांची पोलिसांनी तपासणी केली.
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कंबर कसली आहे. सध्या रात्रीच्या पोलीस गस्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील बेकायदा दारूधंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक खोत यांचे प्रयत्न सुरू आहेत.