सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:35 PM2018-10-23T15:35:26+5:302018-10-23T15:39:33+5:30
सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर हे अष्टपैलू, अभ्यासू आणि झपाटलेले नेतृत्व आहे. प्रथम नोकरी, त्यानंतर जीवनविद्या मिशन आणि आता त्यांनी भाजपासारख्या राष्ट्रहित जपणाऱ्या पक्षात अधिकृत प्रवेश करून तिसऱ्या ईनिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन प्रमाणे ही देखील बहारदार असेल.
सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.
जीवनविद्या मिशनचे अनुयायी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे सुपूत्र आणि शिक्षण महर्षी अॅड. डॉ. सुभाष आरोसकर आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया आरोसकर यांनी खार मुंबई येथील अनुयोग प्रशालेत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आडिवरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योगपती दादासाहेब परूळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश पारकर, विधानसभा अध्यक्ष गुलाब दुबे, अनुयोग संस्थेचे अध्यक्ष सतीश चिंदरकर, प्रसाद मर्गज आदी उपस्थित होते. यावेळी रमाकांत पै, विनायक कारभाटकर, पुण्यातील विभावरी येवले, चंद्रकांत जळगावकर, विक्रम सातारडेकर, अरूण घाडी, विलास देऊलकर, दिनेश आस्वाल आदी उपस्थित होते. पक्षप्रवेश कार्यक्रमापूर्वी सांताक्रूझ येथील संगीत जीवनविद्याच्या टीमने दोन तास आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत धावडे यांनी केले.
आरक्षण बाजूला ठेऊन गोरगरिबांना मदत करा
उद्योगपती दादासाहेब परूळकर म्हणाले, मी अगदी लहानपणापासून सुभाषला जवळून पाहतोय. तो भाजपमध्ये प्रवेश करून नुसता गप्प बसणार नाही. त्याच्यात काहीतरी करून दाखविण्याची धमक आहे. भाजपच्या रूपाने आपण लोकांचे चांगले करेन अशी प्रतिज्ञा त्याने करावी. सध्या सर्वत्र गाजत असलेला आरक्षणाचा विषय बाजूला ठेऊन गोरगरिबांची शोध मोहीम राबवून त्यांना मदत करावी. त्यामुळे समाजात वाढत चाललेली दरी कमी होईल.