सिंधुदुर्ग पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समिती आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 02:49 PM2020-02-06T14:49:27+5:302020-02-06T14:52:26+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील तलावात अतिक्रमण करण्यात आले आहे. पंप लावून तलावातील पाणी उपसा करण्यात आला असून मातीची भर टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे तलावातील ९७ वनस्पती, २० वनौषधी आणि ५२ पक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील तलावात अतिक्रमण करण्यात आले आहे. पंप लावून तलावातील पाणी उपसा करण्यात आला असून मातीची भर टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे तलावातील ९७ वनस्पती, २० वनौषधी आणि ५२ पक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे.
त्यामुळे संबंधितांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समितीने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
यावेळी मंजुलक्ष्मी यांनी कुडाळ तहसीलदार यांना तत्काळ सबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी समितीचे सदस्य डॉ. योगेश कोळी, डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. रवींद्र ठाकूर, अजित कानशेडे, सुषमा केणी, सचिन देसाई, प्रवीण सावंत, हसन खान, संदीप राणे आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, भारत देशात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समिती स्थापन झाली असून जिल्ह्यातील पाणथळ जागांचा सर्व्हे झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५७ पाणथळ जागा निश्चित झाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व पाणथळ जागा संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यात नेरूर येथील ६०९७ नंबरच्या तलावाचा पाणथळ म्हणून समावेश आहे. या तलावातील पाणी पंप लावून उपसा करण्यात आले आहे. तसेच वाहने चालविण्यासाठी माती टाकून रस्ता करण्यात आला आहे.
तलावात क्रिकेटचे मैदान करण्यात आले आहे. याबाबतची आॅनलाईन तक्रार कोकण आयुक्तांना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तक्रार केल्यानंतर ४८ तासांत कारवाई होणे बंधनकारक आहे. तरीही ही कारवाई करण्यात न आल्याने पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समितीने कुडाळ तहसीलदार यांची प्रथम भेट घेतली. यावेळी तहसीलदार यांनी आपण हजर झाल्यावर चार दिवस झाल्याचे सांगितले.
तसेच आजच भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले होते. तरीही आम्ही आपली भेट घेऊन लक्ष वेधत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तत्काळ कारवाई करण्याचे कुडाळ तहसीलदार यांना आदेश दिले.
९७ वनस्पतींच्या प्रजाती; पक्ष्यांचे जीवन अडचणीत
नेरूर तलावात ९७ प्रकारच्या प्रजाती आहेत. या प्रजाती ४८ कुळातील आहेत. यातील २ कुळे शेवाळ जातीची आहेत. ५ एकदल, ४१ द्विदल प्रकारच्या तर एक वाऱ्याला थांबविण्याची क्षमता असणारे विंड मास्टर, ९ रानभाज्या, ४ फळ उत्पादक, एक पाण्यातील वनस्पती आहे. तसेच २० औषधी, ११ पाणथळ प्रजाती आणि २ पाणी देणाऱ्या प्रजाती आहेत. या सर्वांच्या अस्तित्वाला धोका या अतिक्रमणामुळे झाला आहे, असे यावेळी डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी सांगितले.
या तलावात एकूण ५२ पक्षी वास्तव्य करतात. यात संकटग्रस्त २ पक्ष्यांचा समावेश आहे. छोटी टिकुकली, कमळ पक्षी यांचा यात समावेश आहे. तसेच स्थलांतरित काळ्या मानेचा करकोचा, नदी सूरय, धनेश या पक्ष्यांचाही समावेश आहे. या पक्ष्यांसह कीटक, जलचर प्राणी यांचाही जीव धोक्यात आला आहे, अशी माहिती यावेळी समिती सदस्यांनी दिली.