सिंधुदुर्ग : आंजिवडे-पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण, वनविभागाचे आदेश : उपवनसंरक्षकांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:07 PM2018-09-22T17:07:13+5:302018-09-22T17:11:38+5:30
सोनवडे घाटमार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच आता सिंधुदुर्गमधील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सिंधुदुर्ग : सोनवडे घाटमार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच आता सिंधुदुर्गमधील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
याबाबतची संयुक्त बैठक सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक कार्यालयात पार पडली. या बैठकीला बांधकाम अधिकाऱ्यांसह हा रस्ता व्हावा म्हणून तयार करण्यात आलेल्या समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते.
माणगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी एकदम जवळचा मार्ग म्हणून आंजिवडे-पाटगाव रस्त्याकडे पाहिले जाते. या रस्त्यामुळे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.
या मार्गात आंजिवडे ते धुरेवाडीपर्यंत फक्त अडीच किलोमीटरचा रस्ता वन विभागात येतो. त्यामुळे याचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे.
हा रस्ता व्हावा यासाठी माणगाव येथील किशोर शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची येथील उपवनसंरक्षक कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी बांधकाम अधिकाऱ्यांकडून रस्त्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर वनविभाग या रस्त्याचा सर्व्हे करेल, असे सांगितले. त्याप्रमाणे या रस्त्याच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे.
या मार्गावर अडीच किलोमीटर क्षेत्रात वन आहे. याबाबत लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच पुढच्या महिन्यात पालकमंत्री दीपक केसरकरही या रस्त्याची पाहणी करणार असून, त्यानंतर याबाबत कशा पध्दतीने पुढील कार्यवाही करायची हे निश्चित होणार आहे.