सिंधुदुर्ग : हुंबरठमधील अभियंत्याचा लेप्टोने मृत्यू, आरोग्य केंद्रामार्फत सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 05:10 PM2018-07-23T17:10:19+5:302018-07-23T17:12:45+5:30
कणकवली तालुक्यातील हुंबरठ-पिंपळवाडी येथील सिध्देश चंद्रकांत माणगांवकर (२७) याचा मुंबई-भांडूप येथे लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाला. अभियंता असलेला सिध्देश हा मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला होता.
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील हुंबरठ-पिंपळवाडी येथील सिध्देश चंद्रकांत माणगांवकर (२७) याचा मुंबई-भांडूप येथे लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाला. अभियंता असलेला सिध्देश हा मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला होता.
प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबईत मुलुंड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर हुंबरठ गावात शोककळा पसरली आहे.
सिध्देश याने हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तो आईवडिलांसमवेत मुंबई-भांडूप येथे राहत होता. मुंबईतील एका बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून तो नोकरीला होता. ३० जून रोजी तो आईवडिलांसमवेत शेतीच्या कामासाठी हुंबरठ येथे गावी आला होता. लावणीची कामे झाल्यानंतर हे कुटुंबीय ६ जुलै रोजी मुंबईला गेले.
गावी असताना त्याला कोणतीही तापाची लक्षणे नव्हती. मात्र मुंबईत गेल्यानंतर १३ जुलै रोजी त्याला उलटीचा त्रास झाल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. त्याला श्वसनाचा त्रास होत होता.
रूग्णालयात दाखल केल्यापासून तो बेशुध्दावस्थेतच होता. प्रकृती अधिक गंभीर होत त्याचा मृत्यू झाला. लेप्टोस्पायरोसीसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले. सिध्देशच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत हुंबरठ-पिंपळवाडीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तापाचा रूग्ण आढळून आला नाही.
खबरदारीच्या उपाययोजनांविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली, असे कणकवली तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सिध्देश याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे.