सिंधुदुर्ग : मडुरा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद बॉक्स, नागरिकांत भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:32 PM2018-04-09T15:32:06+5:302018-04-09T15:32:06+5:30
कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बांदा-शिरोडा मार्गाशेजारी गेल्या दोन-तीन दिवसांत कचऱ्यांचे भले मोठे ढीग जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या कचऱ्यांच्या ढिगात एक सुमारे पाच फुटांचा संशयास्पद बॉक्स असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कचरा व तो संशयास्पद बॉक्स हटविण्याची मागणी होत आहे.
बांदा : कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बांदा-शिरोडा मार्गाशेजारी गेल्या दोन-तीन दिवसांत कचऱ्यांचे भले मोठे ढीग जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या कचऱ्यांच्या ढिगात एक सुमारे पाच फुटांचा संशयास्पद बॉक्स असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कचरा व तो संशयास्पद बॉक्स हटविण्याची मागणी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत या उपक्रमाला मडुरा येथे वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे. बांदा-शिरोडा मार्गावर गेले दोन ते तीन दिवस अज्ञातांकडून कचरा टाकण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. या कचऱ्यात गाड्यांचे टायर, सीट कव्हरची गादी, तुटलेल्या कॅसेट, प्लास्टिक, औषधांच्या बाटल्या यांचा समावेश आहे.
या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच कचरा टाकलेले ठिकाण मडुरा व पाडलोस हद्दीवर असल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा कचऱ्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कचरा टाकणाऱ्या अज्ञातावर कडक कारवाई करावी व हा कचरा तसेच संशयास्पद बॉक्स तातडीने हटवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.