सिंधुदुर्ग :...त्या वाहनचालकांवर कारवाई करा : परशुराम उपरकर, परिवहन विभागाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:50 PM2018-05-04T14:50:03+5:302018-05-04T14:50:03+5:30
खासगी वाहनचालक तसेच मालक पर्यटकांची पिळवणूक करीत असतात. अशा लोकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करावी अन्यथा मनसे संबंधिताना धडा शिकवेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.
कणकवली : उन्हाळी सुटीच्या हंगामात सिंधुदुर्गात अनेक चाकरमानी तसेच पर्यटक मिळेल त्या वाहनातून येत असतात. या हंगामात त्यांच्याकडून खासगी वाहनचालक तसेच मालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची पिळवणूक करीत असतात. अशा लोकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करावी अन्यथा मनसे संबंधिताना धडा शिकवेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.
संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.
यावेळी उपरकर म्हणाले, ओरोस येथे मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी अशोक शिंदे यांची भेट घेतली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.
उन्हाळी सुटीच्या हंगामात सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या पर्यटक तसेच चाकरमान्यांमुळे रेल्वे, एसटी हाऊसफुल असतात. अशावेळी खासगी वाहनांचा आधार हे लोक घेतात. मात्र, या चाकरमानी तसेच पर्यटकांकडून वारेमाप भाडे आकारले जाते. गाड्यांची स्थिती चांगली नसली तरी जादा भाडे घेतले जाते.
अलीकडेच परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या भाड्याच्या दीडपट भाडे प्रवाशांकडून लक्झरी तसेच खासगी वाहनाना घेता येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे याबाबत जनतेचे प्रबोधन करणारे फलक उपप्रादेशिक परिवहन विभागाने ठिकठिकाणी लावावेत. तसेच जादा भाडे आकारणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. वेळप्रसंगी त्यांचा परवाना रद्द करावा. प्रवाशांचा सुखकर प्रवास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मनसेने केली आहे.
महामार्गाचे काम सुरू असून कणकवलीलगत गडनदी पुलाजवळ तसेच अन्य ठिकाणी संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नाहीत. त्याठिकाणी अत्यंत तकलादू व्यवस्था करण्यात आलेली आहे. चालकांच्या संरक्षणाबाबतीत योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे उन्हाळी सुटीच्या हंगामात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात मातीच्या ढिगाऱ्यातील माती रस्त्यावर येऊन गाड्या स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग ठप्प होण्याची शक्यता आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
महामार्गासाठी काम करणारी वाहने अनेकवेळा भरधाव असतात. त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या स्तरावर संबंधित ठेकेदार तसेच इतर वाहन चालकांवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार!
मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आले. दौऱ्याची तारीख राज ठाकरे जाहीर करणार आहेत.
या दौऱ्यात राज ठाकरे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, मच्छिमार, बेरोजगार तरुण, प्रकल्पग्रस्त अशा लोकांना भेटून त्यांचे प्रश्न तसेच समस्या जाणून घेणार आहेत, असे यावेळी परशुराम उपरकर यांनी सांगितले.