सिंधुदुर्ग : भाजपाने राजकीय शब्द न पाळल्यास वेगळी भूमिका घेणार : तानाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:46 PM2019-01-14T16:46:33+5:302019-01-14T16:48:40+5:30
२७ जानेवारीपूर्वी भाजपाने राजकीय शब्द न पाळल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ असा इशारा शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिला.
कणकवली : शिवसंग्राम पक्ष मराठा समाजाची भूमिका घेऊन गेली १६ वर्षे लढत आहे. काही कालावधीत राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या समवेत राहून देखील समाजाला न्याय मिळाला नाही.त्यामुळे भाजपासोबत गतवेळच्या निवडणुकीत महाआघाडीत आम्ही सहभागी झालो.त्यावेळी दिलेला शब्द भाजपा नेतृत्वाकडून पाळला गेलेला नाही.त्यामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये चिड निर्माण झाली आहे.२७ जानेवारीपूर्वी भाजपाने राजकीय शब्द न पाळल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ असा इशारा शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिला.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सतीश परब , मराठा नेते एस.टी.सावंत, लवू वारंग, अविनाश राणे, अशोक सावंत यांच्यासह शिवसंग्रामचे जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तानाजी शिंदे पुढे म्हणाले, शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारीला औरंगाबाद येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला दीड लाख लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अनेक लोक उपस्थित रहाणार आहेत.
आमचे पदाधिकारी राज्यभर दौरा करून शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनाची तयारी करीत आहेत.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भारती लव्हेकर आदींसह मराठा नेते व चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या १६ वर्षातील लेखाजोखा या निर्धार मेळाव्यात मांडला जाणार आहे.
शिवसंग्रामची मराठा आरक्षणाची भूमिका या सरकाने मान्य केली. त्याचा उहापोह या कार्यक्रमात करण्यात येईल, असे तानाजी शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले शिवसंग्रामने गेल्या १६ वर्षात मराठा आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर जागरण यात्रा काढली. त्यानंतर गोंधळ, जागर सभा घेतल्या. २०१३ मध्ये नारायण राणे समितीने सकारात्मक अहवाल सादर केला. ते आरक्षण न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे भाजपा सरकारने न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन मागास आयोग नेमून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द पाळला आहे. हळुहळू समाजाचे प्रश्न सुटू लागले आहेत. जे प्रश्न आहेत ते पुन्हा नव्याने या निर्धार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसमोर मांडले जातील. शेतकऱ्यांना ३ हजार रूपये पेन्शन द्या, उच्चशिक्षीत बेरोजगार मुलांना पाच हजार रूपये भत्ता मिळावा, नदी जोड प्रकल्पांना चालना द्यावी, या प्रमुख मागण्या आम्ही घेऊन यापुढे लढत राहणार आहोत.
भारतीय संग्राम परिषदेच्या माध्यमातून बीडमध्ये व राज्यभरात आम्ही विविध निवडणुका जिंकत आहोत. त्यामुळे आगामी काळात शिवस्मारक पुर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची राहणार आहे. स्मारकासाठी अडचणी आल्यातरी त्याच जागेवर स्मारक झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे तानाजी शिंदे यांनी यावेळी सांगितले.