सिंधुदुर्ग : तारामुंबरी नस्त भाग नौकांकरिता धोकादायक, मच्छिमार बांधवांची मागणी : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:09 PM2018-12-18T16:09:54+5:302018-12-18T16:19:23+5:30
तारामुंबरी येथील समुद्रातील नस्त भाग हा मच्छिमारी नौकांकरिता धोकादायक झाला असून तारामुंबरी नस्त बंदरातील खडके व गाळ काढण्यात येऊन हा मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी तारामुंबरी येथील मच्छिमार बांधवांनी आमदार नीतेश राणे व मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.
देवगड : तारामुंबरी येथील समुद्रातील नस्त भाग हा मच्छिमारी नौकांकरिता धोकादायक झाला असून तारामुंबरी नस्त बंदरातील खडके व गाळ काढण्यात येऊन हा मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी तारामुंबरी येथील मच्छिमार बांधवांनी आमदार नीतेश राणे व मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी खास बैठकीचे आयोजन तारामुंबरी येथे केले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय खात्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आर. आर. महाडीक, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, ताम्हणकर, तारामुंबरी मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या चर्चेत प्रामुख्याने तारामुंबरी नस्त हा भाग मच्छिमारी नौकांना धोकादायक झाला असून यापूर्वीही छोट्या मोठ्या मच्छिमारी नौकांना या भागात अपघात झाले आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे अतोनात नुकसान होत असून या भागातील खडके व गाळ उपसण्यात यावा व या बंदराचा योग्य तो आराखडा बनविण्यात येऊन तारामुंबरी नस्त भाग सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी उपस्थितांनी केली.
या अनुषंगाने संबंधित खात्याच्या अधिकाºयांकडे आवश्यक तो आराखडा स्थानिक मच्छिमारांनी मांडून त्या संदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करावी याकरिता आवश्यक त्या निधीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.
तसेच परप्रांतीय हायस्पीड नौकांच्या घुसखोरीबाबत ठोस कारवाई मत्स्य व्यवसाय खात्यामार्फ त करण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर मांडली. त्यावेळी अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी साधनसामुग्री यामुळे ठोस कारवाई करणे शक्य होत नाही. तरीही आतापर्यंत ३५ हून अधिक नौकांवर कारवाई केल्याच सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी नमूद केले.
यासंदर्भात मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत आगामी काळात परप्रांतीय हायस्पीड नौकांवर कारवाई करणे अशक्य होत असेल तर तसा अहवाल पोलीस प्रशासनाकडे द्यावा.
जेणेकरून या परप्रांतीय नौकांवर कारवाईसाठी स्थानिक आक्रमक झाल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनामार्फत होणार नाही याची खबरदारी मत्स्य व्यवसाय खात्याने घ्यावी, असेही आमदार राणे यांनी शेवटी सांगितले.