सिंधुदुर्ग : ट्रकची ताडपत्री फाडून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास, टोळीची लिंक गुजरातपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:23 PM2018-04-30T15:23:57+5:302018-04-30T15:23:57+5:30
कुडाळ येथे महामार्गानजीक उभ्या करून ठेवलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून ९ लाख ४९ हजार ८३६ रुपयांचा माल चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे.
कुडाळ : कुडाळ येथे महामार्गानजीक उभ्या करून ठेवलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून ९ लाख ४९ हजार ८३६ रुपयांचा माल चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी मुश्ताक अहमद भागलिया (३७, रा. गुजरात) व विनोेद भगवानंद बनिया (४०, रा. नंदुरबार) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरीमागे मोठ्या टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
१ एप्रिल रोजी हा चोरीचा प्रकार घडला होता. ट्रकचालक नवनाथ शिंदे (रा. सातारा) यांनी आपला माल भरलेला ट्रक कुडाळ येथील राज हॉटेलसमोर उभा करून ठेवला होता. या ट्रकमध्ये सीनियर ट्रान्सपोर्टचा माल होता. त्या मध्यरात्री या ट्रकमधील सुमारे ९ लाख ४९ हजार ८३६ रुपयांचा माल चोरीला गेला होता.
चोरीप्रकरणी पोलिसांनी हस्तगत केलेली कार.
याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांच्याजवळ होता. त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने तपास करण्यास सुरुवात केली. या तपासात चोरी झालेल्या ठिकाणच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. तसेच त्यावेळचे मोबाईलचे लोकेशन आणि त्याठिकाणाहून झालेले कॉल डिटेल पडताळण्यात आले.
या सगळ्या तांत्रिक तपासामध्ये त्या ठिकाणी वावर असलेल्या के्रटा या गाडीची माहिती घेण्यासाठी पोलीस गुजरातला गेले. त्यावरून या गाडीचे मालक आणि नंतर धागेदोरे सापडत गेले. या प्रकरणात मुश्ताक भागलिया व विनोद बनिया हे दोघेजण सापडले.
तसेच चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रकही ताब्यात घेण्यात आला. या दोन्ही गाड्या चोरीवेळी कुडाळ शहरात होत्या असे आढळून आले. दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता २ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
या चोरीचे धागेदोरे थेट गुजरात राज्यात पोहोचले असून यामध्ये काही मोठे व्यापारी असण्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली. अशाप्रकारची चोरी करणाऱ्या टोळ्या गुजरात राज्यात आहेत. या चोरीतील माल कुठे विक्री केला, याचाही तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून काही जण सापडण्याची दाट शक्यता आहे.