सिंधुदुर्ग : ...तर इमारत जेसीबीने पाडून टाका : लक्ष्मण रावराणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 04:49 PM2018-09-08T16:49:36+5:302018-09-08T16:53:13+5:30

पंचायत समिती इमारतीच्या कामाची मुदत संपून दोन वर्षे उलटली. या इमारतीमुळे तालुक्याची नाचक्की झाली आहे. तरीही बांधकाम विभाग ठेकेदाराला मुदतवाढ देत सुटला आहे. जर इमारतीचे काम पुर्ण करायचे नसेल; तर जेसीबीने पाडून टाका. म्हणजे विषयच संपून जाईल, अशा शब्दांत सभापती लक्ष्मण रावराणे यांनी मासिक सभेत जिल्हा परिषद बांधकामच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

 Sindhudurg: ... then remove the building by the JCB: Lakshmana Ravanane | सिंधुदुर्ग : ...तर इमारत जेसीबीने पाडून टाका : लक्ष्मण रावराणे

सिंधुदुर्ग : ...तर इमारत जेसीबीने पाडून टाका : लक्ष्मण रावराणे

Next
ठळक मुद्देवैभववाडी पंचायत समितीची सभा जिल्हा परिषद बांधकामच्या कार्यपद्धतीबाबत व्यक्त केला संताप

वैभववाडी : पंचायत समिती इमारतीच्या कामाची मुदत संपून दोन वर्षे उलटली. या इमारतीमुळे तालुक्याची नाचक्की झाली आहे. तरीही बांधकाम विभाग ठेकेदाराला मुदतवाढ देत सुटला आहे. जर इमारतीचे काम पुर्ण करायचे नसेल; तर जेसीबीने पाडून टाका. म्हणजे विषयच संपून जाईल, अशा शब्दांत सभापती लक्ष्मण रावराणे यांनी मासिक सभेत जिल्हा परिषद बांधकामच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपसभापती हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, शशिकांत भरसट, सदस्य मंगेश लोके, अक्षता डाफळे, दुर्वा खानविलकर आदी उपस्थित होते.

विकास कामांचा आढावा सुरु होताच नेहमीप्रमाणे पंचायत समिती इमारतीच्या कामाचा विषय सभागृहात चर्चेला आला. त्यावेळी सभापती रावराणे आक्रमक झाले. गेली दोन वर्षे हा विषय सभेत सातत्याने चर्चेला येतो. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. २०१६ मध्ये इमारतीच्या कामाची मुदत संपली.

त्यानतंर दोन वर्ष झाली. मात्र अजूनही इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराची मनमानी सुरुच आहे. कुणीही पाहणी करु नये म्हणून ठेकेदार इमारतीच्या दरवाज्यांना कुलुप लावून काम करतो. आमच्या कार्यालयासमोरचे काम नीट करुन घेता येत नसेल तर इतर कामे दर्जेदार होतील, अशी अपेक्षा कशी ठेवायची? असा प्रश्न त्यांनी बांधकाम विभागाला केला. त्यावेळी उपअभियंता आर. पी. सुतार यांनी येत्या दोन तीन महिन्यात इमारतीचे काम पुर्ण करुन घेतले जाईल, असे आश्वासन दिले.

कामे रखडविणाऱ्या ठेकेदार आणि ग्रामपंचायतींना कामे देवू नयेत. कामे मुदतीत होत नसल्यामुळे त्याचा तालुका विकासावर परिणाम होत आहे. अशी सदस्य मंगेश लोके यांनी भूमिका मांडली. त्यावेळी गटविकास अधिकारी परब यांनी असे ठेकेदार आणि ग्रामपंचायतीची यादी तयार करुन त्यांना नोटीस काढण्याची अशी सूचना बांधकाम विभागाला दिली. याचवेळी मंजूर कामांची अदांजपत्रके तातडीने तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.|

मानव विकास योजनेंतर्गत कुर्ली येथील आरोग्य उपकेंद्राचे काम रखडल्याचा मुद्दा लोके यांनी उपस्थित केला. त्यावेळी उपअभियंता सुतार यांनी त्याबाबत कबुली देत तातडीने पूर्ण करुन घेण्याचे आश्वासन दिले. शाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी ऐनारी व आचिर्णेतील सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे ती तात्काळ उपलब्ध करुन द्यावीत, अशी सूचनाही यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे यांनी केली.

सैनिक कुटुंबाला प्रशासनाने न्याय द्यावा

सैनिक कुटुंबियांच्या अपमान प्रकरणी विस्तार अधिकारी आणि संबंधित ग्रामसेवकावर कारवाईचा ठराव गेल्या सभेत झाला. तो जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सैनिक कल्याण अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे.
परंतु, त्याबाबत अद्याप कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. प्रशासनाने दोषींवर कारवाई करुन सैनिकाच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी सभापती रावराणे यांनी केली.

मृतदेहांची अवहेलना ही चूक ग्रामीण रुग्णालयाची

पोलीस ज्या रुग्णालयात मृतदेह नेतात त्याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करणे बधंनकारक आहे. तसे शासनाचे परिपत्रक आहे. असे असताना ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शवविच्छेदन करीत नसतील तर ती त्यांची चूक आहे, असे तालुका आरोग अधिकारी डॉ. सी. वाय. महारनूर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Web Title:  Sindhudurg: ... then remove the building by the JCB: Lakshmana Ravanane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.