सिंधुदुर्ग : प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही : सुरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 02:04 PM2018-08-24T14:04:57+5:302018-08-24T14:09:23+5:30
वेंंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे होणाऱ्या प्रस्तावित सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिल्लीमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. आॅगस्ट महिन्यात प्रभू यांनी सलग तिसऱ्यांदा आढावा घेऊन चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
सिंधुदुर्ग : वेंंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे होणाऱ्या प्रस्तावित सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. आॅगस्ट महिन्यात प्रभू यांनी सलग तिसऱ्यांदा आढावा घेऊन चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
दिल्ली येथे झालेल्या विशेष बैठकीला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयआरबी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभू यांनी विमानतळ प्रकल्पाबाबत काही समस्या असल्यास त्या तातडीने नमूद करून सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रवासी वाहतुकीला आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही, असे आदेशही दिले.
महाराष्ट्र शासनाकडून आयआरबी कंपनीला काही समस्या असल्यास त्या सोडविण्याच्यादृष्टीनेही शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. सुरेश प्रभू यांच्याकडे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जून महिन्यात चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत सर्व अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या भेटीदरम्यान प्रभू यांनी येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत चिपी विमानतळ सुरू करण्याच्यादृष्टीने पावले उचलली जातील, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.
त्यानंतर जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत प्रभू यांनी या विमानतळाच्या कामाला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. चिपी विमानतळाचे भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे आणि केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले होते.
हवाई मंत्रालयाचा अद्याप ग्रीन सिग्नल नाही
प्रत्यक्षात सुरेश प्रभू किंवा हवाई वाहतूक मंत्रालयाने चिपी विमानतळ सुरू कधी होणार याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र, या विमानतळाचे काम शीघ्रगतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय खासगी कंपन्यांची विमाने येथे उतरू शकत नाहीत.