सिंधुदुर्ग : शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण, विजय पाटकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:52 PM2018-01-15T14:52:06+5:302018-01-15T14:55:51+5:30
मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका प्रज्ञा प्रसाद कांबळी यांनी वैद्यकीय परिपूर्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले. मात्र कांबळी यांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही ते प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे कांबळी यांचा वैद्यकीय प्रस्ताव शिक्षण विभागाने तब्बल १५ महिने रखडवून ठेवला आहे.
मालवण : येथील भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका प्रज्ञा प्रसाद कांबळी यांनी वैद्यकीय परिपूर्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले. मात्र कांबळी यांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही ते प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे कांबळी यांचा वैद्यकीय प्रस्ताव शिक्षण विभागाने तब्बल १५ महिने रखडवून ठेवला आहे.
शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबाबत संस्थेचे चेअरमन विजय पाटकर यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी व्हावी, अशी लेखी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिक्षण संचालकांकडे केली आहे.
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून प्रज्ञा प्रसाद कांबळी कार्यरत आहेत. त्यांचे पती प्रसाद कांबळी हे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने आजारी होते.
आर्थिक ओढाताण सहन करीत प्रज्ञा कांबळी यांनी त्यांना गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २७ मार्च २०१६ रोजी त्यांचे निधन झाले.
पतीच्या निधनानंतर प्रज्ञा कांबळी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर त्यांनी शासकीय नियमानुसार उपचाराला सहाय्यभूत होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेखाली २२ आॅक्टोबर २०१६ आणि १७ एप्रिल २०१७ रोजी वैद्यकीय परिपूर्तीचे एकूण पाच प्रस्ताव सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले.
चौकशीची मागणी
सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्यापही हे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत. याबाबत कांबळी यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही १५ महिन्यांत त्यांना काहीच उत्तर अथवा न्याय देण्यात आलेला नाही. त्यामुळे संस्थेचे चेअरमन विजय पाटकर यांनी चौकशीची मागणी केली आहे.