सिंधुदुर्ग : मेरिटाईम बोर्डाकडून पर्यटन व्यावसायिक वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:15 PM2018-07-07T17:15:25+5:302018-07-07T17:18:13+5:30
तारकर्ली येथे वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी पर्यटनासाठी बोटींग व्यवसाय सुरु केला आहे. या बोटिंग व्यावसायिकांना नियमावलीच्या नावाखाली मेरीटाईम बोर्डाकडून वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे.
सिंधुदुर्ग : तारकर्ली येथे वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी पर्यटनासाठी बोटींग व्यवसाय सुरु केला आहे. या बोटिंग व्यावसायिकांना नियमावलीच्या नावाखाली मेरीटाईम बोर्डाकडून वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी सुरज नाईक यांनी काढलेल्या जाचक अटींच्या फतव्यांमुळे तारकर्ली येथील बोटिंग व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याकडे तारकर्लीतील बोटिंग व्यावसायिकांनी स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले.
यावेळी खासदार राणे यांनी बोटिंग व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर सुरज नाईक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत मच्छीमारांशी सलोख्याने वागण्याच्या सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
मालवण येथे तारकर्ली येथील बोटिंग पर्यटन व्यावसायिकांनी तारकर्लीचे माजी सरपंच जितेंद्र केरकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार राणे यांची भेट घेतली. यावेळी राजेश केरकर, चेतन टिकम, प्रदीप केळुसकर, राजेश खराडे, सुरेंद्र केळुसकर, सुनील केरकर, लक्ष्मण कुबल, विष्णू देऊलकर, अर्जुन भोवर, सतीश टिकम यांसह अन्य उपस्थित होते.
मच्छिमारांसाठी काम करा
स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर खासदार राणे यांनी मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी सुरज नाईक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे येथील स्थानिक मच्छिमारांसाठी असलेले खाते असून या खात्याचा कारभार मच्छिमारांच्या हितासाठी व्हावा, अशा सूचना खासदार राणे यांनी केल्या.
येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बोटिंग व्यवसाय सुरु केला असून येथील स्थानिक मच्छिमार बोटिंग व्यावसायिकांच्या अडचणींकडे तातडीने लक्ष घाला, असेही राणे म्हणाले.