सिंधुदुर्ग नगररचना अधिकाऱ्यांना दिला रंगाचा डबा अन् ब्रश, शिवसेनेचे अनोखे आंदोलन
By सुधीर राणे | Published: April 20, 2023 02:52 PM2023-04-20T14:52:15+5:302023-04-20T14:52:34+5:30
आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या जमिनीबाबत वेगळी भूमिका घेऊन शहरवासीयांची फसवणूक करण्याचे काम सत्ताधारी नगरसेवक करत असल्याचा आरोप
कणकवली: कणकवली शहर विकास आराखडा सादर करण्याची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग नगररचना विभागाकडून अद्याप तो सादर करण्यात आलेला नाही. मात्र, कणकवलीचे उपनगराध्यक्ष काही व्यावसायिकांशी संपर्क करून ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी यलो झोन करून देण्याचे खात्रीशीर सांगत आहेत.
त्यासाठीच हा आराखडा सादर करण्यास विलंब लागत आहे का? असा सवाल शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळके यांनी ओरोस येथील नगररचना विभागाच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांना विचारला. तसेच कणकवलीचा सर्व शहर विकास आराखडा यलो करण्यासाठी अधिकाऱ्यांना रंगाचा डबा व ब्रश देऊन अनोखे आंदोलन केले. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपूर्वी कणकवली शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत तो सादर करण्यात आलेला नाही. त्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी ओरोस येथील नगररचना विभागात भेट देऊन लवकरात लवकर शहर विकास आराखडा सादर करण्याची वारंवार मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांकडून केवळ तारखा देण्यात आल्या. यातील शेवटची तारीख २४ मार्च देण्यात आली होती. मात्र, त्यालाही एक महिना होत आला तरी देखील आराखडा अद्याप सादर केलेला नाही.
कणकवलीचे उपनगराध्यक्ष काही व्यवसायिकांना फोन करून ज्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांच्या जमिनी यलो झोन करण्याची खात्री देत आहेत. नागवे रोड येथील एक जमीन यलो केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या जमिनीबाबत वेगळी भूमिका घेऊन शहरवासीयांची फसवणूक करण्याचे काम सत्ताधारी नगरसेवक करत असल्याचा आरोप उमेश वाळके यांनी केला असून यासाठीच शहर विकास आराखडा सादर करण्यास विलंब होत आहे का?असा सवाल उमेश वाळके यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.