सिंधुदुर्ग : जीवघेण्या सेल्फीतून पर्यटक बचावले, रॉक गार्डनजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:06 PM2018-05-28T16:06:34+5:302018-05-28T16:06:34+5:30
रॉक गार्डन येथील समुद्रालगत सेल्फी काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. ते तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाईकांनी समुद्रात उडी घेत त्या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी झालेल्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मालवण : रॉक गार्डन येथील समुद्रालगत सेल्फी काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. ते तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाईकांनी समुद्रात उडी घेत त्या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी झालेल्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, ठाणे-मुंबई येथील विजय कृष्णा चव्हाण यांची पत्नी गीता, मुलगी मानसी, दिशा, मेहुणे प्रदीप प्रकाश कदम, पत्नी मेघना, सासू, सासरे असे सात जणांचे कुटुंब २३ मे रोजी पर्यटन सफरीसाठी निघाले होते. दहा दिवसांची त्यांची पर्यटन सफर होती.
रविवारी हे सर्वजण दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान रॉक गार्डन येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास आले होते. रॉक गार्डन परिसरात समुद्रापासून काही अंतरावर असलेल्या खडकाळ भागात विजय चव्हाण यांच्या मुली मानसी (१९) व दिशा (१३), प्रदीप कदम (३८) हे छायाचित्र काढत होते.
छायाचित्रांसाठी समुद्री लाटेची वाट पाहत असताना अचानक समुद्राची उंच लाट खडकावर आदळली. या लाटेमुळे मानसी, दिशा व प्रदीप कदम हे समुद्रात फेकले गेले. हे तिघेही बुडत असल्याचे दिसताच त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच अन्य पर्यटकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
आपल्या मुली बुडत असल्याचे दिसताच विजय चव्हाण व त्यांचे नातेवाईक राज चौकेकर यांनी आपला जीव धोक्यात घालत समुद्रात उडी मारली आणि तिघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. यात विजय चव्हाण यांच्या हाताला दुखापत झाली. समुद्रात पडलेल्या तिघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले.
मालवण समुद्रात पडलेल्या प्रदीप कदम यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.