सिंधुदुर्ग : विदेशी पर्यटकांचा आता परतीचा प्रवास, किनारे झाले सुने सुने, उष्म्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:47 AM2018-03-09T11:47:29+5:302018-03-09T11:47:29+5:30
हिवाळा ऋतुच्या सांगतेबरोबरच उन्हाळी उष्म्याचे प्रमाण वाढत असल्याने रेडीसह जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटत आहे. यावर्षी रेडी किनाऱ्यासह शिरोडा पॅराडाईज बीच, वेळागर, टांक, मोचेमाड भागातील सर्वच किनारे पर्यटकांनी बहरून गेले होते.
बाळकृष्ण सातार्डेकर
सिंधुदुर्ग : हिवाळा ऋतुच्या सांगतेबरोबरच उन्हाळी उष्म्याचे प्रमाण वाढत असल्याने रेडीसह जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटत आहे. यावर्षी रेडी किनाऱ्यासह शिरोडा पॅराडाईज बीच, वेळागर, टांक, मोचेमाड भागातील सर्वच किनारे पर्यटकांनी बहरून गेले होते. मात्र, वाढत्या उष्म्याने पर्यटकांनी भारत सफारीचा आनंद लुटून आता परतीचा प्रवास सुरू केल्याने समुद्रकिनारे पुन्हा सुने-सुने होऊ लागले आहेत.
गोवा व महाराष्ट्राच्या सीमेवर औद्योगिक व पर्यटनदृष्ट्या प्रगतीपथावर वसलेले निसर्गसंपन्न रेडी हे गाव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. गोव्याप्रमाणे कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यांपर्यंत पर्यटनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या रेडी येथील यशवंतगड किल्ला, मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाबरोबरच डॉल्फिन दर्शन, स्कुबा डायव्हिंग, स्नॉॅर्कलिंग, पॅराग्लायडिंग यासारख्या जलक्रीडा प्रकारांची भुरळ देशी-विदेशी पर्यटकांना पडू लागली आहे. येथील पर्यटन हंगाम सध्या बारमाहीकडे वाटचाल करीत असून, आॅक्टोबरपासूनच पर्यटकांची पावले येथील समुद्रकिनाऱ्यांकडे वळू लागल्याचे दिसून येते.
रेडी परिसरातील पर्यटन हंगाम आॅक्टोबर ते फेबु्रवारीपर्यंत तेजीत चालला. मात्र, डिसेंबर महिना याला अपवाद ठरला. डिसेंबरमध्ये किनारपट्टीच्या भागात ओखी चक्रीवादळाचा फटका बसल्याने या दरम्यानच्या दहा ते बारा दिवसांत पर्यटकांची संख्या रोडावली होती.
मात्र, वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर पर्यटन हंगाम पुन्हा तेजीत आला. सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यांवरील गर्दी कमी होताना दिसत आहे. मात्र, या पाच महिन्यात मिळालेल्या रोजगाराबाबत स्थानिक व्यावसायिकांतून समाधानाचे सूर उमटत आहेत.
गावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देवी माऊली देवस्थान, स्वयंभू द्विभुज महागणपती, महादेव मंदिर, सिध्देश्वर मंदिर, शिवकालीन यशवंतगड किल्ला, गुहा, जाते, कनयाळेवाडीतील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर, रामपुरूष मंदिर, नवदुर्गा मंदिर, विठोबा रखुमाई मंदिर, साईबाबा मंदिर, कर्पेवाडीतील स्वामी समर्थ मंदिर, रेडी बंदर, रेडी गावच्या प्रवेशद्वारावर वसलेले सत्यपुरूष मंदिर, शिरोडा-वेळागर समुद्रकिनारा, आरवली येथील प्रसिध्द वेतोबा मंदिर, शिरोडा येथील श्री माऊली मंदिर आदी धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देऊन पर्यटकांनी पर्यटनाचा यथेच्छ आनंद लुटला.
पर्यटकांना आपुलकीची भुरळ
यावर्षी रेडी, शिरोडा, वेळागर परिसरात रशिया, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, इस्त्राईल आदी देशातील पर्यटकांनी पर्यटकांचा आनंद लुटला. निसर्ग सौंदर्याने नटलेली किनारपट्टी, गोव्यापेक्षा अनुभवयास मिळणारी शांतता, स्वच्छता तसेच येथील स्थानिकांकडून मिळणारी आपुलकी, प्रेम, मार्गदर्शन, स्वागत करण्याची पध्दत याची भुरळ पर्यटकांना पडत आहे. या सर्वामुळे वर्षातून एकदा तरी येथील किनारपट्टीवर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येण्याच्या प्रतिक्रिया पर्यटकांतून व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाल्यामुळे येथील परिसरात यापुढे पर्यटनावर आधारीत पंचतारांकित हॉटेल होणार आहेत. मात्र, येथील स्थानिक युवक हॉटेल विषयक प्रशिक्षणासाठी गोवा राज्यात जातात आणि तेथेच रोजगार मिळवून स्थिरस्थावर होतात. येथील शिक्षण व्यवस्थेने युवकांना व्यवसायाभिमुख शिक्षण उपलब्ध करून दिल्यास युवक येथेच रोजगार मिळवून आर्थिक प्रगती साधू शकतात. यातून रेडी गावातील, पर्यायाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय अधिक तेजीत येईल.
- बिटो रेडकर,
ग्रामस्थ