सिंधुदुर्ग : समुद्रात बुडाला ट्रॉलर, सतरा खलाशांना सुखरूप आणण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:46 PM2018-09-17T13:46:11+5:302018-09-17T13:53:40+5:30
मासेमारी करून परतताना आचरा-पिरावाडी येथील समुद्रातील नस्तानजीक मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक ट्रॉलर बुडाल्याची घटना घडली. या ट्रॉलरवरील सतरा खलाशांना दोरीच्या साह्याने किनार्यावर सुखरूप आणण्यात आले.
आचरा : मासेमारी करून परतताना आचरा-पिरावाडी येथील समुद्रातील नस्तानजीक मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक ट्रॉलर बुडाल्याची घटना घडली. या ट्रॉलरवरील सतरा खलाशांना दोरीच्या साह्याने किनार्यावर सुखरूप आणण्यात आले.
दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी हा ट्रॉलर किनार्यावर आणण्यात यश मिळाले. हडी येथील रियान अझीज शेख यांच्या मालकीचा हा ट्रॉलर असून यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान या ट्रॉलरला ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करण्याचा परवाना असताना त्यांच्याकडून पर्ससीनच्या जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे दिसून आल्याने याची मत्स्यव्यवसाय विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.
गेले काही दिवस समुद्रात किमती मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे हडी येथील रियान शेख यांच्या मालकीचा ट्रॉलर गेले दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी गेला होता.
मध्यरात्री हा ट्रॉलर मासेमारी करून परतत असताना आचरा पिरावाडी येथील समुद्रात नस्तानजीक सुकतीमुळे कलंडला. ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी व जाळी असल्याने समुद्राचे पाणी आत घुसल्याने तो बुडाला. ट्रॉलरवरील खलाशांनी याची माहिती किनार्यावरील सहकार्यांना दिली.
त्यानुसार रियान मुजावर, किशोर तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, आसिफ मुजावर, फिरोज मुजावर, बुधाजी पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह पिरावाडी, जामडूल, हिर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी किनार्यावर धाव घेतली.
यातील काहींनी दोरीच्या साह्याने ट्रॉलरवरील सतरा खलाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मध्यरात्रीपासून हा ट्रॉलर वाचविण्यासाठी मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा ट्रॉलर किनार्यावर काढण्यात यश मिळाले. यात ट्रॉलरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अक्षय धेंडे, फरांदे यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. मत्स्यव्यवसायचे अधिकारी मात्र घटनास्थळी दाखल झालेले नव्हते.