सिंधुदुर्ग : कारवर झाड कोसळले, कुडाळ येथील प्रकार, वाहतूकही काळी वेळ ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:13 PM2018-06-12T17:13:48+5:302018-06-12T17:13:48+5:30
कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकेशियाचे झाड कारवर पडून कारचे नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला. यामुळे वाहतूकही काळी वेळ ठप्प झाली होती.
कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकेशियाचे झाड कारवर पडून कारचे नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला. यामुळे वाहतूकही काळी वेळ ठप्प झाली होती.
हे झाड एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
आंब्रड येथील राजू भोगटे यांनी आपल्या ताब्यातील कार कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर कुडाळ हायस्कूलच्या मैदानाजवळ उभी केली होती.
ते चहा पिण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये गेले. याच दरम्यान कुडाळ हायस्कूलच्या मैदानाच्या सीमेवर असलेले आकेशियाचे झाड कारवर कोसळले. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एमआयडीसी येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला केले.
या घटनेत कारच्या पुढील काचेचा चक्काचूर झाल्याने राजू भोगटे यांचे मोठे नुकसान झाले.
मात्र सुदैवाने ते अपघातातून बचावले. या ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी प्रयत्न केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी भोगटे यांच्याकडून माहिती घेतली. झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.