सिंधुदुर्ग : देवगडात गावठी बाजार होण्यासाठी प्रयत्न करा : प्रसाद देवधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:20 PM2018-02-26T18:20:27+5:302018-02-26T18:20:27+5:30
स. ह. केळकर महाविद्यालय देवगड आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचतगटांसाठी उद्योजकता अभिप्रेरण कार्यशाळा देवगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी भगिरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रसाद देवधर बोलत होते.
देवगड : देवगड तालुक्याच्या मुख्य ठिकाणीही आठवडा गावठी बाजार भरविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत भगिरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रसाद देवधर यांनी देवगड महाविद्यालयामध्ये झालेल्या महिला बचतगट कार्यशाळेमध्ये व्यक्त केले.
स. ह. केळकर महाविद्यालय देवगड आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचतगटांसाठी उद्योजकता अभिप्रेरण कार्यशाळा देवगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जनार्दन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. जी. टी. परूळेकर, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, सहकार्यवाह एकनाथ तेली, नियामक समिती सदस्य अमोल जामसंडेकर, व्ही. सी. खडपकर, कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. सुखदा जांभळे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. सुरेश कुर्लीकर आदी उपस्थित होते.
या एकदिवसीय कार्यशाळेत जिल्ह्यातील व्यवसाय संधी या विषयावर भगिरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रसाद देवधर यांनी मार्गदर्शन करताना आठवडा गावठी बाजाराची संकल्पना सविस्तर मांडली.
या कार्यशाळेमध्ये उद्योग व्यवसाय आणि आराखडा या विषयावर मॅथ्यू मॅटम (संचालक युथ अॅण्ड फाऊंडेशन, सिंधुदुर्ग), उद्योगासाठी अर्थ उभारणी या विषयावर अनिरूध्द देसाई (व्यवस्थापकीय संचालक सिंधुदुर्ग जिल्हा बँक), महिलांसाठी व्यवसाय व सुरक्षाविषयक कायदे याविषयी अॅड. निलांगी रांगणेकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जी. टी. परूळेकर यांनी केले. सूत्रसंचालन अपेक्षा सकपाळ यांनी केले.