सिंधुदुर्ग : शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करा : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:39 PM2018-08-17T15:39:01+5:302018-08-17T15:44:14+5:30
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यातील त्यागभावना त्यांच्या वयाच्या किती तरुणांमध्ये आहे, याचा विचार करुन प्रत्येकाने शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करावा, असे मत आमदार नीतेश राणे यांनी सडुरे येथे शोकसभेत व्यक्त केले.
वैभववाडी : देशाच्या रक्षणासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये असली पाहिजे. त्याबरोबर आपण देशासाठी किती योगदान देतो याचेही चिंतन आवश्यक आहे. २८ वर्षीय शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यातील त्यागभावना त्यांच्या वयाच्या किती तरुणांमध्ये आहे, याचा विचार करुन प्रत्येकाने शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करावा, असे मत आमदार नीतेश राणे यांनी सडुरे येथे शोकसभेत व्यक्त केले.
पंचायत समिती व सडुरे ग्रामपंचायतीच्यावतीने शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या (रावराणे) मूळगावी रवळनाथ मंदिरात शोकसभा आयोजित केली होती.
यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, तहसीलदार संतोष जाधव, भाजप नेते अतुल रावराणे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, नगराध्यक्षा दीपा गजोबार, उपसभापती हर्षदा हरयाण, गटशिक्षणाधिकारी मारुती थिटे, सरपंच अंकिता रावराणे, बंडू मुंडल्ये, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, विजय रावराणे, रवींद्र रावराणे, बाळा कदम, बंड्या सावंत, बाळा हरयाण, संपदा राणे, अॅड. अजितसिंह काळे, पुंडलिक साळुंखे, नवलराज काळे आदी उपस्थित होते.
आमदार राणे पुढे म्हणाले, देशवासीयांचे रक्षण करण्याच्या भावनेने शहीद मेजर कौस्तुभ यांनी प्राणांची बाजी लावली. त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे नाव घेतले जात आहे. आपण समाजात वावरताना देशाप्रती प्रत्येकाची हीच भावना असली पाहिजे. आपल्यातील एक तरुण गेल्याचे दु:ख सर्वांनाच आहे. परंतु, शहीद मेजर कौस्तुभ यांच्याप्रमाणे बनू शकतो का? याचा विचार आपण केला पाहीजे.
कौस्तुभ राणेंचा अस्थिकलश २0 ला वैभववाडीत
४उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखताना शहीद झालेले सडुरेचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) यांचा अस्थिकलश सोमवारी (२0 आॅगस्ट) कोल्हापूरमार्गे सकाळी वैभववाडीत आणला जाणार आहे.
वैभववाडीतून हा अस्थिकलश त्यांच्या सडुरेतील घरी नेऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नेण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती शहीद मेजर कौस्तुभ यांचे चुलते माजी सरपंच विजय रावराणे यांनी दिली.