सिंधुदुर्ग : दोन दिवसांत पाच जणांना सर्पदंश, दोघांची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:29 PM2018-06-25T17:29:09+5:302018-06-25T17:32:40+5:30
दोन दिवसांत ५ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील दोघेजण अत्यवस्थ असून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बोर्डवे येथील मलेरियाचा एक रुग्ण दाखल झाला आहे.
कणकवली : दोन दिवसांत ५ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील दोघेजण अत्यवस्थ असून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बोर्डवे येथील मलेरियाचा एक रुग्ण दाखल झाला आहे.
कासार्डे-अहिरेवाडी येथील सागर चंद्रकांत पाताडे (२७) याला रविवारी सकाळी सर्पदंश झाला. नातेवाईकांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात ताबडतोब दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवले.
वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी-फाटकवाडी येथील भारती रघुनाथ रावराणे यांना सर्पदंश झाल्याने त्यांना प्रथम वैभववाडी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले.
तेथे केलेल्या उपचाराला त्यांनी साथ न दिल्यामुळे व विष न उतरल्यामुळे त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
कणकवली तालुक्यातील कुरंगवणे येथील भाग्यश्री भालचंद्र सुतार (२५) हिला घोणस जातीच्या सर्पाने दंश केल्यामुळे नातेवाईकांनी तिला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला.
कणकवली तालुक्यातील नागवे येथील रवींद्र महादेव सांगवेकर (४३) यांना सर्पदंश झाल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. कळसुली येथील ऋषिकेश सुतार (१५) या शाळकरी मुलाला सर्पदंश झाला. त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करून त्याला घरी पाठविले.
पावसाच्या लहरीपणामुळे मलेरियाच्या साथीने डोके वर काढले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रविवारी बोर्डवे येथील मलेरियाचा एक रुग्ण दाखल झाला. त्याच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
बोर्डवे परिसरातील रुग्णांनी मलेरियाच्या साथीबाबत भीती व्यक्त केली आहे. सध्या पाऊस जोरदार कोसळत असल्यामुळे व भातलावणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे ही साथ जोरात पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने या साथीबाबत खबरदारी घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.