सिंधुदुर्ग : हेल्मेट नसणा-या दुचाकीस्वाराचे होणार दोन तासाचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:51 PM2018-12-11T13:51:38+5:302018-12-11T13:53:13+5:30
यापुढे हेल्मेट न वापरणा-या दुचाकीस्वाराला दंडाबरोबरच दोन तासाच्या समुपदेशनास उपस्थित राहणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बंधनकारक केले आहे.
सिंधुदुर्गनगरी : यापुढे हेल्मेट न वापरणा-या दुचाकीस्वाराला दंडाबरोबरच दोन तासाच्या समुपदेशनास उपस्थित राहणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बंधनकारक केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या समितीने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांनी दिली.
अशोक शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गुन्ह्यांसाठी दंडाव्यतिरिक्त होणाऱ्या कारवाईचा तपशीलामध्ये लाल सिग्नल ओलांडणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन, वाहन चालवताना मोबाईल वापरणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन, दारू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तसेच न्यायालयात गुन्हा दाखल, अतिरिक्त माल वाहतुक करणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तसेच माल उतरविणे, माल वाहतुक वाहनातुन प्रवासी वाहतुक करणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तसेच परवाना रद्द व वाहनांची नोंदणी निलंबन, हेल्मेट न वापरणे दोन तासासाठी समुपदेशास परिवहन कार्यालयात उपस्थिती, सिट बेल्ट न लावणे दोन तासासाठी समुपदेशास परिवहन कार्यालयात उपस्थिती असे सदस्य सचिव जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांनी म्हटले आहे.