सिंधुदुर्ग : मंत्रिपदाची उतराई विकासातून : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:02 PM2018-09-01T16:02:46+5:302018-09-01T16:06:51+5:30
भविष्यात जिल्ह्यातील सर्वच खरेदी-विक्री संघ सक्षम करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी : मी विकासात कोठेही राजकारण करत नाही. मात्र मला मिळालेल्या मंत्रिपदाची उतराई विकासातून करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचा जास्तीत जास्त विकास करणे हेच माझे ध्येय आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्वच खरेदी-विक्री संघ सक्षम करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
तालुका खरेदी-विक्री संघाच्या सावंतवाडीतील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, सहनिबंधक दीपक खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सखाराम ठाकूर, उपाध्यक्ष अरूण गावडे, नगसेवक बाबू कुडतरकर, ज्येष्ठ नेते वसंत केसरकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गजानन गावडे, अशोक दळवी, दिलीप सोनुर्लेकर, सुनील देसाई, माजी संचालक अभिमन्यू लोढे, संदीप केसरकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडीतील खरेदी-विक्री संघ हा जुना आहे. या खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. या खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून रोजगार यावा अशी भूमिका संघाची आहे. त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतून काय नवीन करता येते का हे मी मंत्री म्हणून बघेनच.
सध्या रेशनिंगवर रॉकेल मिळत नाही. त्यामुळे खुल्या बाजारात रॉकेल मिळावे यासाठी जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघांनी पुढे यावे. मी त्यांना मदत करेन, असे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले.
मी विकासात कोणतेही राजकारण करणार नाही आणि टिकेला उत्तरही देणार नाही. मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण मला मंत्रिपदाची विकासातून उतराई करण्याची संधी आली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त निधी सिंधुदुर्गमध्ये आणला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी अध्यक्ष सखाराम ठाकूर यांनी संघाला एखादी गॅस एजन्सी मिळावी, अशी मागणी मंत्री केसरकर यांच्याकडे केली. या उद्घाटन समारंभानिमित्त गुणवंतांचा तसेच वयोवृद्धांचा सत्कार करण्यात आला.