सिंधुदुर्ग :  वैभववाडीतील चक्रीवादळ : महावितरणला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 03:11 PM2018-05-19T15:11:59+5:302018-05-19T15:11:59+5:30

चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या पंचनाम्यानुसार घरे व गोठ्यांंचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर अनेक गावातील इमारतींच्या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाले नव्हते.

Sindhudurg: Vaibhavavadi Hurricane: Mahavitaran hit most | सिंधुदुर्ग :  वैभववाडीतील चक्रीवादळ : महावितरणला सर्वाधिक फटका

चक्री वादळामुळे तालुक्यातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते.

googlenewsNext
ठळक मुद्देवैभववाडीतील चक्रीवादळ : महावितरणला सर्वाधिक फटकाखांबाळेत ३५0 काजू झाडे उद्ध्वस्त, नुकसान ५0 लाखांच्या घरात

वैभववाडी : चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या पंचनाम्यानुसार घरे व गोठ्यांंचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर अनेक गावातील इमारतींच्या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाले नव्हते.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. तालुक्यातील ३७ खांब मोडून पडल्याने १५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर खांबाळेतील रमेश अनाजी परब यांची ३५० काजूंची बाग उद्ध्वस्त झाली. वादळी पावसाने गुरुवारी खंडित झालेला वैभववाडी शहरातील वीजपुरवठा शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्याचा फटका विविध आस्थापनांसह शासकीय कार्यालयांना बसला.

वैभववाडी तालुक्यातील अनेक गावात गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने दाणादाण उडवून दिली. त्याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. तालुक्याच्या विविध भागातील ३७ खांब मोडून पडले. तर १५० गाळ्यातील वीजवाहिन्या तुटल्याने सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले.

त्यामुळे संपूर्ण तालुक्यात गुरुवारी रात्री अंधाराचे साम्राज्य होते. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि खासगी कंत्राटदारांचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

वैभववाडी शहरातील इमारतींच्या छप्परांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, त्यापैकी बहुतांश नोंद महसूलकडे झालेली नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत महसूलकडे प्राप्त माहितीनुसार नावळे गावातील नुकसानग्रस्त मालमत्तांची संख्या जास्त आहे.

नावळेमधील भैरु गुरखे (९००), सावित्री सावंत (१५२५०), दिगंबर गुरव (२५००), मारुती शेळके (४२०५), लक्ष्मण शेळके (२४३५) ग्रामपंचायत कार्यालय व धनगरवाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेलाही देखील या वादळाचा तडाखा बसला.

सडुरे येथील भगवान बोडेकर (१०००), रवींद्र पवार (१२००), दिलीप राणे (१२००), काशीनाथ राणे (१२००), आचिर्णे येथील सावित्री झोरे(१००००), सुहास दर्डे(५००००), खांबाळेतील शिवाजी कोर्लेकर (४००००), महेंद्र बोडेकर (२००००), प्रकाश दळवी (७०००), वाभवेतील सुहास राणे (९००००), अंकुश परब (१२०००), नारकरवाडीतील दाजी बर्गे (५३७५), खांबलवाडीतील यशवंत तानवडे (२५००), मौदेतील अनंत कांबळे (३०००), सोनाळीतील अंबिका पाडावे (१२०००), पुष्पलता पाडावे (४०००), श्रीकांत पाडावे (१४०००), सदाशिव पाडावे (१३०००) यांचे घर व गोठा यांचे नुकसान झाले.

खांबाळे येथील रमेश अनाजी परब यांच्या बागेतील सुमारे ३५० काजू उन्मळून पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मांगवली लोकमवाडी येथील अनंत सुतार यांच्या घराचे संपूर्ण छप्पर वादळात उडाले. त्यामुळे छप्पराखाली सापडून दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

करुळ गावातील काही इमारतींचे नुकसान झाले आहे. मात्र, उशिरापर्यंत महसूलकडे आकडेवारी उपलब्ध नव्हती. त्यामुळे नुकसानीचा आकडा ५० लाखांच्यावर जाण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस व वादळाने तालुक्यात मोठी नुकसानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अधिकाऱ्यांची भेट

नावळे येथे भेट देऊन चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार जी.आर. गावीत होते. तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. बी. लोथे यांनी तुटलेले खांब आणि वीजवाहिन्यांची पाहणी करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती.

 

Web Title: Sindhudurg: Vaibhavavadi Hurricane: Mahavitaran hit most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.