सिंधुदुर्ग : मालवणात पहिल्याच दिवशी बांगडाराज, मासेमारीला पोषक वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:25 PM2018-08-02T14:25:25+5:302018-08-02T14:27:30+5:30
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मत्स्य हंगामाला सुरुवात झाली. समुद्रही काहीसा शांत झाल्याने रापण पद्धतीच्या मासेमारीला समुद्रात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मालवण किनारपट्टीवर गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात बांगडा प्रजातीची मासळी मिळत असून मत्स्य हंगामाच्या दिवशीही बांगडाच मोठ्या प्रमाणात मिळाल्याने मत्स्य खवय्यांना परवडणाऱ्या दरात मासळी मिळाली.
मालवण : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मत्स्य हंगामाला सुरुवात झाली. समुद्रही काहीसा शांत झाल्याने रापण पद्धतीच्या मासेमारीला समुद्रात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मालवण किनारपट्टीवर गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात बांगडा प्रजातीची मासळी मिळत असून मत्स्य हंगामाच्या दिवशीही बांगडाच मोठ्या प्रमाणात मिळाल्याने मत्स्य खवय्यांना परवडणाऱ्या दरात मासळी मिळाली.
गेले तीन दिवस पावसाने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात विश्रांती घेतली असल्याने मासळी मिळण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मत्स्य हंगाम सुरू होण्यापूर्वीपासून काही दिवस सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बांगडा मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यात आजपासून मत्स्य हंगाम सुरू झाला आणि खास करून मत्स्य खवय्यांची पावले मच्छिमार्केटकडे वळू लागल्याचे चित्र होते.
मत्स्य हंगामाची सुरुवात झाली असली तरी बरेच मच्छिमार नारळी पौर्णिमेनंतर होड्या, नौका समुद्रात लोटतात. त्यामुळे पोटाची खळगी भरणारे मच्छिमार धाडस करून मासेमारी करत आहे. नारळीपौर्णिमा होईपर्यंत मोठ्या नौका किनाऱ्यावरच असल्याने अपेक्षित मासळी मिळू शकणार नाही. मात्र, छोट्या मच्छिमारांच्या जाळीत अडकलेली मासळी खवय्यांचे चोचले पुरवणार आहे.
दर्याराजासाठी आश्वासक सलामी
मालवण किनारपट्टीचा विचार करता सकाळी मोठ्या प्रमाणात बांगडा मासळी मिळाली. त्याचबरोबर मोरी, कर्ली, इसवन (सुरमई) आदी मासळी मिळाली. मत्स्य हंगाम सुरू झाल्याने मत्स्य खवय्यांची वर्दळ दिवसभर मच्छिमार्केट परिसरात दिसून आली. त्यामुळे येणाऱ्या काळात मासेमारीसाठी पोषक वातावरण राहिल्यास दर्याराजासाठी आश्वासक सलामी मिळू शकेल.