सिंधुुदुर्ग : पाडलोसवासीयांचा उपवनसंरक्षकांना घेराओ, गव्यांकडून पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:46 PM2018-04-06T13:46:21+5:302018-04-06T13:46:21+5:30
गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला.
सिंधुुदुर्ग : गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला.
दरम्यान, पंचनामा करण्यास वेळ नसेल तर आम्हाला सेवेत घ्या आम्ही शेतकऱ्यांसाठी झटतो, असे ग्रामस्थांकडून सुनावण्यात आले. यावेळी आपण तत्काळ पंचनामा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कल्पना देतो, असे आश्वासन समाधान चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिले.
मडुरा, पाडलोसमध्ये गव्यांनी पिकांची नासधूस करण्याचे सत्र सुरु असतानाच वनविभागाने शेतकऱ्यांप्रती दाखविलेल्या उदासीनतेपोटी पाडलोस पंचक्रोशीसह आरोस गावातील शेतकऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग कार्यालयातील सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराव घातला.
यावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, मडुरा ग्रामकमिटी माजी अध्यक्ष दिलीप परब, बाळा परब, मडुरा शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले, सुधीर गावडे, बापू गावडे, अमोल माधव, गोविंद माधव, विजय गवंडी, आजगाव वनपाल अमित कटके, पाडलोस वनपाल विशाल पाटील तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राजू शेटकर म्हणाले की, वनविभागाच्या उदासिन भुमिकेमुळे आज शेतकरी पंचनाम्याकडे पाठ फिरवत आहेत. पंचनामा केला तरी मिळणारी तुटपुंजी भरपाई सावंतवाडी कार्यालयात येण्याजाण्यासाठीच खर्च होते. शेतकऱ्यांनी वनपालांना ते पंचनाम्यासाठी येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वन कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान अशा उपद्रवी जंगली प्राण्यांपासून शेती वाचवायची असेल तर सौरकुंपणाचा प्रयोग करणे आवश्यक आहे. तसेच दोन दिवसांतून एकदा वनपाल यांनी गावात भेट देऊन पोलीस मित्राप्रमाणे वनमित्र तयार केले पाहिजेत. तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकतील.
आम्ही बँकेमधून कर्ज घेऊन बागायती केल्या. परंतु, रात्रीच्या वेळी गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे आम्ही कर्ज भरणा कसे करणार, आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. नविभागाने अशा उपद्रवी प्राण्यांवर योग्य ती उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येस सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
सौरकुंपणाचा लाभ घ्या
यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई त्यांना मिळणार आहे. तसेच नावीन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांनी ८० टक्के अनुदान व २० टक्के भरणा या तत्वावर सौरकुंपण घालून घ्यावे. याचा प्रयोग पाडलोस येथे बाळा परब यांच्या बागेत करणार असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सौरकुंपणाचा लाभ घ्यावा असे, आवाहनही चव्हाण यांनी केले.