सिंधुदुर्ग : ग्रामस्थांनी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला, मंदिरातील पुजारी बदलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 05:07 PM2018-08-06T17:07:03+5:302018-08-06T17:15:33+5:30
कोकिसरे महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे विरोधी गुरव गटाने उघडल्याचा आरोप करीत त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केले.
वैभववाडी(सिंधुदुर्ग) : कोकिसरे महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे विरोधी गुरव गटाने उघडल्याचा आरोप करीत त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केले.
दुपारी १.४५ वाजल्यापासून तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग दीड तास ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनामुळे विद्यार्थी अडकून पडले होते.
मंदिराचे टाळे काढणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी धुडकावून लावत मंदिराच्या विषयासंदर्भात तालुका दंडाधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास कोकिसरेतील महिला व ग्रामस्थ वैभववाडीत दाखल झाले होते.
त्यांच्या शिष्टमंडळाने पुन्हा बाकारे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यावेळी बाकारे यांनी दंडाधिकाऱ्यांकडे जाण्यास सांगितले. त्यामुळे सर्व ग्रामस्थ तहसीलदारांना भेटण्यासाठी गेले होते.
तहसीलदार संतोष जाधव यांनी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. मात्र, ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे सायंकाळी मंदिराला भेट देऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले. परंतु, तहसीलदारांच्या निर्णयाने समाधान न झाल्यामुळे दुपारी पावणे दोनच्या सुमारास महिला व ग्रामस्थांनी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीची चांगली कोंडी झाली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी रस्ता खुला करा, अन्यथा सर्वांना ताब्यात घ्यावे लागेल, असे स्पष्ट केल्यानंतर तहसीलदारांशी चर्चा करण्याच्या अटीवर कोकिसरे ग्रामस्थांनी रस्ता रोको थांबवून मार्ग खुला केला. तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर ग्रामस्थांची पुढील दिशा ठरणार आहे.