सिंधुदुर्ग, रत्नागिरीत दुसऱ्या टप्प्यात मतदान
By Admin | Published: January 11, 2017 11:07 PM2017-01-11T23:07:04+5:302017-01-11T23:07:04+5:30
राजकीय हालचालींना वेग : पदाधिकाऱ्यांच्या गाड्या प्रशासनाच्या ताब्यात
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, बुधवारपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी ही असल्याने प्रत्यक्षात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी मिळेल जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता असून, त्यांचे ४० सदस्य, तर शिवसेना ६, भाजप ३, तर राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पंचवार्षिक कार्यकाल २१ मार्च २०१७, तर आठही पंचायत समित्यांचा कार्यकाल १३ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठीच्या अंतिम मतदार याद्या २१ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८३ पंचायत समित्या आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुका १६ व २१ फेब्रुवारी २०१७ अशा दोन टप्प्यांत घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)
दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गसाठी मतदान
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठीची निवडणूक प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २१ फेब्रुवारीला होणार आहे, तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र सादर करणे १ ते ६ फेब्रुवारी २०१७, नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ फेब्रुवारी, जिल्हा न्यायाधीशांकडे अपील दाखल करणे १० फेब्रुवारी, दाखल अपीलांवर निकालाची संभाव्य अंतिम तारीख १३ फेब्रुवारी, अपील नसल्यास अशा ठिकाणची उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी, अपील असल्यास उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१७, मतदान २१ फेब्रुवारी व मतमोजणीची दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ रोजी होणार आहे.
५० गट व १०० गणांसाठी निवडणुका
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० गटासाठी व आठही पंचायत समित्यांच्या १०० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सध्या जिल्हा परिषद व दोडामार्ग, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, देवगड व वैभववाडी या सातही पंचायत समित्या काँग्रेसकडे आहेत, तर केवळ वेंगुर्ले ही एकमेव पंचायत समिती शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांवर कोणता पक्ष आपली सत्ता आणतो हे प्रत्यक्ष २३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल.
जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबल
२०१२ रोजी झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे ३३ सदस्य, तर राष्ट्रवादीचे सहा, शिवसेनेचे आठ व भाजपचे ३ सदस्य निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे पाच व सेनेचे दोन सदस्य काँग्रेसवासी झाल्याने काँग्रेसचे संख्याबळ ४० वर गेले, तर विरोधकांचे संख्याबळ राष्ट्रवादी-१, सेना-६, भाजप ३ असे आहे.
जामसंडे कमी होऊन माडखोल वाढला
मतदारसंघ पुनर्नियोजन कार्यक्रमात देवगड तालुक्यातील जामसंडे मतदारसंघ कमी होऊन सावंतवाडी तालुक्यातील माडखोल मतदारसंघ नव्याने उदयास आला आहे. तरीही जिल्हा परिषद मतदारसंघांची आकडेवारी ही ५० एवढीच राहिली आहे.पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेतल्या ताब्यात
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे बुधवारी प्रशासनाने जिल्हा परिषद अध्यक्षांसह, समाजकल्याण सभापती, महिला व बालविकास सभापती, शिक्षण व आरोग्य सभापती यांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
तिकिटासाठी चढाओढ
निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच बहुतांश इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारांची तिकिटासाठी रीघ लागली आहे. यामुळे कोणाला तिकीट द्यावे व कोणाला देऊ नये, अशा द्विधाअवस्थेत पक्षप्रमुख सापडले आहेत. त्यातच पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २१ फेब्रुवारी २०१७ ला मतदान होणार असून २३ फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता ११ जानेवारी २०१७ पासून लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. दोन दशके सेना-भाजप युतीकडे असलेली जिल्हा परिषदेची सत्ता यावेळी एकहाती सेनेकडे जाणार की भाजप व अन्य पक्ष सेनेला एकटे पाडून सत्ता काबीज करणार, याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.
आचारसंहिता लागू झाल्याने लोकप्रतिनिधींकडील वाहने शासनाकडे जमा करण्याचे आदेश थडकले आहेत. त्यानुसार रात्री उशिरा ही वाहने शासनाककडे जमा करण्यात आली
आहेत. (प्रतिनिधी)
या वाहनांचा समावेश
रत्नागिरी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हापरिषदेचे चार विषय समिती सभापती तसेच रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळुण, गुहागर, खेड, मंडणगड व दापोली तालुका पंचायत समितींचे सभापती यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शासकीय वाहनांचा त्यात समावेश आहे.