सिंधुदुर्ग : पाणीटंचाई आराखडे कागदावर नको : नीतेश राणे, प्रशासनाला सुनावले खडे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 06:11 PM2019-01-02T18:11:42+5:302019-01-02T18:16:07+5:30
सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टँकर लावण्याची वेळ येईल़ त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून पाणी टंचाईची कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या़
सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हा टँकरमुक्त जिल्हा केला आहे़ पुन्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टँकर लावण्याची वेळ येईल़ त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून पाणी टंचाईची कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या.
पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे़ दरवर्षी पाणी टंचाईचे आराखडे केवळ कागदावरच बनविले जातात़ पाणी टंचाईची कामे कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरू होईपर्यंत पाऊस सुरू होतो़ अनेक कामे उशिरा झाल्यामुळे टंचाईच्या कालावधीत सर्वसामान्यांना त्याचा लाभ होत नाही़, अशा शब्दात नीतेश राणे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.
कणकवली तालुका पंचायत समिती पाणी टंचाई आढावा बैठक एचपीसीएल सभागृहात नीतेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीला सभापती सुजाता हळदिवे राणे, उपसभापती सुचिता दळवी, जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत, स्वरूपा विखाळे, श्रेया सावंत, सायली सावंत, डिचवलकर, बाळा जठार, तहसिलदार संजय पावसकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता गुरसाळे आदींसह पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते़.
पाणी टंचाई आढावा बैठकी प्रारंभी गतवेळच्या कामांचा आढावा घेण्यात आला़ बिडवाडी, बोर्डवे या गावांसह अन्य गावांमधील बक्षीसपत्राअभावी पाणी टंचाईतील कामे झाली नाहीत़ त्याबाबत आमदारांनी गावचे सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली़ जमिनदारांनी बक्षिसपत्र देण्यास टाळाटाळ केल्यास समोर आले़ यावेळी ओटव सरपंच हेमंत परुळेकर यांनी ग्रामपंचायतीला आवश्यक असलेल्या पाणी टंचाईतील जमिनींसाठी ग्रामपंचायतच्या ठरावावर जमीन मिळाली पाहिजे, असा ठराव घ्या, अशी मागणी केली़ त्यावर राणे यांनी ठरावास मान्यता दिली़.
सन २०१८-१९ कणकवली तालुका पाणी टंचाई आराखड्यात १७७ कामे सुचविण्यात आली आहेत़ त्याचा अंदाजीत आराखडा १ कोटी १६ लाख ३७ हजार रूपयांचा करण्यात आला आहे़ अन्य कामे येत्या दोन दिवसात संबंधित ग्रामपंचायतमधून पंचायत समितीला सादर करण्यात यावीत़ प्रपत्र अ व ग्रामपंचायत ठराव मागणी करण्यात यावी, अशी माहिती उपअभियंता गुरसाळे यांनी दिली़.
त्यावर आमदारांनी तुमच्या सोईनुसार आराखडा करू नका़ टंचाईतील कामे फेब्रुवारी, मार्चपर्यंत सुरू होण्याच्यादृष्टीने आत्तापासूनच कामाला लागा़ पाणी टंचाईची पुन्हा २६ व २७ जानेवारीला आढावा बैठक घ्या, अशा सूचना केल्या़.
या बैठकीत जुन्या व नवीन कामांबाबत तालुक्यातील सरपंचांनी आपल्या भूमिका मांडल्या़ तसेच तक्रारीही करण्यात आल्या़ महसूल विभागाकडून आलेल्या तक्रारींबाबत तहसिलदारांना चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आमदारांनी केल्या़
सत्ताधाऱ्यांच्या विकासाची नेमकी व्याख्या कोणती
पाण्यासारख्या महत्वाच्या विषयाच्या बैठकीला काही सरपंच अनुपस्थितीत राहतात, ही निराशाजनक बाब आहे़ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे़ गेल्या तीन वर्षात पाणी टंचाईतील कामांसाठी पैसे आले नाहीत, ही बाब सरकार दरबारी पोहोचण्यासाठी सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे़.
जिल्ह्याचे पालकमंत्री केवळ विकासाच्या वल्गना करतात़ प्रत्यक्षात मात्र निधी मिळत नाही़ त्यामुळे विकासाची नेमकी व्याख्या कोणती? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले़