सिंधुदुर्ग : वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे रखडलेले काम केव्हा सुरू होणार ?, आश्वासनांची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 07:21 PM2018-02-28T19:21:18+5:302018-02-28T19:21:18+5:30
वेंगुर्ले नगरपरिषदेचा अद्ययावत मच्छिमार्केटचा रखडलेला प्रश्न आता आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेत्यांबरोबरच प्रवासी व पादचारी वर्गासही त्रासदायक ठरू लागला आहे. अद्ययावत मच्छिमार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वारंवार निवेदने दिली जातात. यावर महिनाभरात काम सुरू होणार असल्याची आश्वासने मिळतात; मात्र अद्ययावत मच्छिमार्केटच्या भूमिपूजनानंतर रखडलेल्या कामाला मूर्त स्वरूप कधी येते, याची आस सर्वांनाच लागली आहे.
सावळाराम भराडकर
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेचा अद्ययावत मच्छिमार्केटचा रखडलेला प्रश्न आता आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेत्यांबरोबरच प्रवासी व पादचारी वर्गासही त्रासदायक ठरू लागला आहे. अद्ययावत मच्छिमार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वारंवार निवेदने दिली जातात. यावर महिनाभरात काम सुरू होणार असल्याची आश्वासने मिळतात; मात्र अद्ययावत मच्छिमार्केटच्या भूमिपूजनानंतर रखडलेल्या कामाला मूर्त स्वरूप कधी येते, याची आस सर्वांनाच लागली आहे.
आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेते रस्त्यानजीक बसल्याने वाहनचालकांना अशी कसरत करावी लागते.
स्वच्छतेत अग्रेसर म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेसमोर अजूनही अद्ययावत मच्छिमार्केट, वाहनतळ, अरूंद रस्ते आदींसारखे ज्वलंत प्रश्न सोडविण्याचा पेच आहे. त्यात व्यक्तिगत हेवेदावे, राजकारण अशा विविध अंतर्गत कारणांनी वेंगुर्लेच्या विकासाला नेहमीच खीळ बसली आहे.
विकासात्मक उपक्रम राबविताना नागरिकांना विचारात न घेता काम सुरू करणे, काम सुरू असताना अर्धवट अवस्थेत ते काम नागरिकांकडून बंद पाडणे, ही नेहमीचीच समीकरणे बनली आहेत. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.
अद्ययावत मच्छिमार्केटचा बऱ्याच वर्षांचा प्रश्न अजूनही सुटत नसल्याने व मच्छी विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळत नसल्याने वाहनतळ, वाहतूक कोंडीसारखे प्रश्न नगरपरिषदेसमोर आ वासून उभे आहेत. विशेषत: रविवारच्या आठवडा बाजारादिवशी याचा फटका सर्वांनाच बसतो.
सद्यस्थितीत पर्यायी जागा म्हणून मच्छी विक्रेते बसत असलेल्या जागेचा रविवारच्या आठवडा बाजारात बाहेरील व्यापारी आश्रय घेतात. आधीच पर्यायी जागा कमी पडत असलेले मच्छी विक्रेते मग हॉटेल लौकिक समोरील रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय थाटतात.
त्यामुळे मुळातच अरुंद असलेला हा मार्ग मच्छी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीस निमंत्रण देतो. जोपर्यंत मच्छिमार्केट अद्ययावत होत नाही, तोपर्यंत वाहनतळ तसेच वाढती वाहतूक कोंडी यासारखे प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत.
वाहतूक पोलिसांची वानवा
वाहनतळाची कमतरता असलेल्या बाजारपेठेत वाहतूक पोलीसही नसल्याने वाहनचालक तसेच बाजारहाट करणाऱ्यांची मार्ग काढताना पुरती दमछाक होते. यातून काहीवेळा वाहनचालकात शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही होतात. असे प्रकार टाळण्यासाठी येथे वाहतूक पोलीस ठेवणे अत्यावश्यक आहे.