सिंधुदुर्ग होणार सुवर्णक्षणांचा साक्षीदार, पहिल्यांदाच उतरणा-या विमानातून गणराया येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 01:57 AM2018-09-12T01:57:34+5:302018-09-12T01:58:01+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ वर्षांपूर्वी विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली, मात्र प्रत्यक्षात उदयास आली सहा वर्षांपूर्वी.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ वर्षांपूर्वी विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली, मात्र प्रत्यक्षात उदयास आली सहा वर्षांपूर्वी. या विमानतळाचे काम सुरू झाल्यानंतर विमानतळ केव्हा पूर्ण होणार याचीच उत्सुकता सर्वांना होती. मात्र अद्याप विमानतळाचे काम सुरू आहे. पण ट्रायल लॅडिंग तरी सिंधुदुर्गात दृष्टीक्षेपात येत असल्याने सिंधुदुर्गवासियांचे डोळे बुधवारच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आतुरलेले आहेत. दुपारी ११.३० वाजता पहिले खासगी विमान सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच या धर्तीवर उतरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला विमानतळाचे पहिले स्वप्न दाखवले ते माजी खासदार सुधीर सावंत यांनी. पण तेव्हा विमानतळ कुठे करायचे ही जागा निश्चित होत नव्हती. अनेक जागाची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. पण त्याला मुहूर्त मिळत नव्हता. अखेरीस त्यांच्याच काळात चिपी येथील माळरान निश्चित करण्यात आले होते. पण तेव्हा काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीची सत्ता आली होती.
मात्र त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ही सिंधुदुर्गमध्ये विमानतळ झाले पाहिजे, हा चंग मनाशी बाळगून प्रत्यक्ष जागा निश्चित करून त्यासाठी ६ कोटी रूपयांचा निधीही दिला होता. पण हे काम करत असताना युतीचीही सत्ता गेली आणि काँग्रेसची सत्ता आली. या विमानतळाची जागा निश्चित झाली, पण पुढे त्याला चालना मिळत नव्हती. आलेला निधीही इतरत्र वळवण्यात आला होता. पण नंतर शिवसेनेतून नारायण राणे हे काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर या विमानतळाच्या कामाला पुन्हा चालना मिळाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीतच माजी आमदार जयानंद मठकर यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते.
त्यानंतर प्रत्यक्ष आयआरबीने ह्यबांधा वापरा हस्तांतर कराह्ण या तत्वावर विमानतळाचे काम हाती घेत पूर्णत्वास नेले. बुधवारी खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गच्या भूमीवर प्रत्यक्ष पहिले विमान उतरणार आहे. हे विमान खासगी कंपनीचे असले आणि ट्रायल लँडिंग होत असले तरी आतापर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीवर हेलिकॉप्टर अनेक उतरली, पण विमान उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य अनेकांना मिळणार आहे.
मुंबईतून बुधवारी दुपारी ११.३० ते १२ च्या दरम्यान हे विमान चिपीच्या धावपट्टीवर उतरणार असून, या विमानातून गणरायांचे आगमन होणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळ परिसरात या निमित्ताने गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे